Just another WordPress site

“मी तुमचा नोकर राहू इच्छितो,….” राहुल गांधीनी वाचून दाखवल्या सावरकरांच्या माफिनाम्यातील ओळी

अकोला: भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून भारत जोडो यात्रा रोखण्याची मागणीही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला प्रतिआव्हान दिले. महाराष्ट्र सरकारला भारत जोडो यात्रा रोखावीशी वाटत असेल तर त्यांनी रोखावी. त्यांनी ही यात्रा रोखण्याचा प्रयत्न करुन पाहावा. पण कोणाला एखादा विचार मांडायचा असेल तर तो मांडून दिला पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे यावेळी दाखवून दिले. राहुल गांधी यांना सावरकर यांच्याविषयी प्रश्न विचारताच, राहुल गांधी यांनी सावरकर यांनी इंग्रजांना लिहलेल्या माफीनाम्याची कागदपत्रे सादर केली. या माफीनाम्यातील शेवटची ओळ राहुल गांधी यांनी वाचून दाखवली. मी तुमचा नोकर राहू इच्छितो, असे सावरकर यांनी माफीनाम्यात म्हटल्याचे राहुल गांधी यांनी अधोरेखित केले. देवेंद्र फडणवीस यांनीही हा माफीनामा बघावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची मदत केली, याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घाबरल्यामुळे इंग्रजांना माफीनामा लिहला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल हे अनेक वर्षे तुरुंगात राहिले, पण कोणताही माफीनाम्याची कोणतीही चिठ्ठी लिहली नाही. पण सावरकरांनी घाबरल्यामुळेच माफीनाम्यावर सही केली. सावरकरांनी त्यावेळी एकप्रकारे स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

भारत जोडोची गरज काय?

यावेळी राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रा काढण्याची गरजच काय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी म्हटले की, देशात सध्या द्वेष आणि हिंसा पसरवली जात आहे. भाजपचे नेते हे तरुणांशी बोलत नाहीत. ते तरुणांशी आणि शेतकऱ्यांशी बोलत असते तर त्यांच्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या असत्या. या वातावरणाविरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. भारत जोडो यात्रेची गरज नाही, असे लोकांना वाटत असते तर लाखो लोकांनी गर्दी केलीच नसती, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!