Just another WordPress site

What is the salary of the Vice President of India? : भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती असतो? पगारासह अन्य कोणत्या सुविधा मिळतात?

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर देशाचं लक्ष आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांकडं लागलं. एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड  तर विरोधी पक्षाकडून युपीएच्या मार्गारेट अल्वा यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली. देशातील हे दुसरं घटनात्मक पद असून उद्या या पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय. त्यामुळं लवकरच देशाला नवे उपराष्ट्रपती मिळतील. याच निमित्ताने भारताच्या उपराष्ट्रपतींचा पगार किती असतो? त्यांना किती भत्ता मिळतो, नेमक्या कोणत्या सुविधा कोणत्या दिल्या जातात? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. व्यंकय्या नायडूंचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार

२. उपराष्ट्रपतींचे निवासस्थान हे उपराष्ट्रपती भवन असते

३. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे घटनात्मक अध्यक्ष असतात 

४. उपराष्ट्रपतीपदासाठी उद्या होणार मतदानाची प्रक्रिया 

उपराष्ट्रपती पदासाठी पात्रता काय?

राष्ट्रपती पदानंतर हे दुसरे घटनात्मक पद आहे.  उपराष्ट्रपतींना संविधानाच्या अनुच्छेद ६३ मधून त्यांचे अधिकार प्राप्त होतात, ज्यात असं सांगितलंय की, ‘भारताचा एक उपराष्ट्रपती असेल. या पदाच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिरक असावा. त्याचे वय किमान ३५ वर्षे असावे. तसेच राज्यसभा निवडणूक लढवण्यास पात्र असावा. 


उपराष्ट्रपतींचा पगार काय असतो?

उपराष्ट्रपतींचे वेतन ‘संसद अधिनियम, १९५३ च्या अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते’ अंतर्गत निर्धारित केले जाते. उपराष्ट्रपतींना कोणतेही वेतन मिळत नाही. म्हणजेच उपाध्यक्षपदासाठी वेतनाची तरतूद नाही. राज्यघटनेत उपराष्ट्रपती असं म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर लोकसभा अध्यक्षांप्रमाणेच ते वरचे सभागृह म्हणजे राज्यसभा चालवतात. त्यामुळे त्यांना सभापती म्हणून वेतन आणि सुविधा दिल्या जातात. २०१८ पर्यंत हे १.२५ लाख रुपये एवढं मासिक वेतन होतं.  त्यात सुधारणा झाल्यानंतर हा पगार २२० टक्के वाढवून आता उपराष्ट्रपतींना दरमहा ४ लाख रुपये पगार मिळतो. महत्वाचं म्हणजे, अनुच्छेद ६४  नुसार, जेव्हा राष्ट्रपती ‘गैहजर, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे’ काम करू शकत नाही, तेव्हा त्यांच्या जागी उपराष्ट्रपती कारभार पाहतात. अशा परिस्थितीत, उपराष्ट्रपतीकडे ‘राष्ट्रपतींचे सर्व अधिकार येतात. सोबत राष्ट्रपतींना मिळणाऱ्या सर्व भत्ते, राष्ट्रपती पदाचा पगार आणि सुविधा उपराष्ट्रपतींना मिळतात. 

निवासस्थान म्हणून उपराष्ट्रपती भवन 

उपराष्ट्रपती पदाच्या सुविधांमध्ये उपराष्ट्रपतींना राहण्यासाठी सोयीसुविधांना सज्ज बंगला मिळतो. तो बंगला पूर्णपणे फर्निचरयुक्त असतो. त्यात गरजेच्या आणि सजावटीच्या प्रत्येक वस्तू असतात. त्याला उपराष्ट्रपती भवनच म्हणतात. या बंगल्याचा पत्ता- बंगला नंबर ६, मौलाना आझाद रोज, नवी दिल्ली… असा आहे. जवळपास पावणे सात एकर परिसरात हा बंगला आहे. 


आणखी कोणत्या सुविधा मिळतात?

– उपराष्ट्रपतींना महागाई भत्ता दिला जातो.

– मोफत वैद्यकीय सुविधाही दिली जाते.  

– फुलटाइम ड्रायव्हर, इंधनाचा खर्च आणि  खासगी कार दिली जातेय.

– याशिवाय, रेल्वे आणि विमान प्रवासाचीही मोफत सुविधा पुरवली जाते.

– माळी, कुक, सफाई कर्मचारी, पर्सनल स्टाफ उपराष्ट्रपतींच्या दिमतीला दिले जातात. 

– लँडलाइन कनेक्शन आणि त्याचा पूर्ण खर्च.

– तसंच पर्सनल सिक्युरिटी आणि बॉडी गार्ड  दिले जातात. 


निवृत्तीनंतरचे फायदे

सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतातील उपराष्ट्रपतींना पेंशनच्या स्वरुपात ५० % निवृत्ती वेतन मिळते. त्यासह अन्य इतरही सुविधादेखील आजीवन मिळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!