Just another WordPress site

कोहिनूर हिऱ्याचा इतिहास काय? कोहिनूर हिरा ब्रिटीशांच्या शाही खजिन्यात कसा गेला?

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात कोहिनूर हिऱ्याबाबत वेगळीच चर्चा सुरू आहे. कोहिनूर हिरा भारतात परत आणावा, अशी मागणी काही नेटकऱ्यांकडून होते. दरम्यान, कोहिनूर हिऱ्याचा नेमका इतिहास काय? तो ब्रिटीशांकडे कसा पोहोचला? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. कोहिनूर हिऱ्याचा इतिहास मोठा रोमांचक
२. कोहिनूर जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक
३. राजे दलीप सिंग यांनी हिरा राणी व्हिक्टोरियाला दिला
४. राणी अँलेक्झांड्रानं कोहिनूर पहिल्यांदा परिधान केला

 

कोहीनूर हिऱ्याचा इतिहास मोठा रोमांचक आहे. सुमारे ८०० वर्षांपूर्वी भारतात एक चमकणारा दगड सापडला होता. ज्याला कोहिनूर नाव देण्यात आलं होतं. कोहिनूर हिरा जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक आहे. कोहीनूर आंध्र प्रदेशातील गुंटूरजवळ काकतीय राजवंशाच्या कालखंडात गोवळकोंडा खाणीत सापडला. १०५ कॅरेटचा हा हिरा अतिशय मौल्यवान आहे. एकेकाळी हा जगातला सर्वात मोठा ज्ञात हिरा समजला जात होता. हा हिरा भारतातील अनेक मुघल आणि फारसी राज्यकर्त्यांकडून शेवटी ब्रिटिशांकडे गेला आणि त्यांच्या शाही खजिन्यात सामील झाला. एलिझाबेथ यांच्या मुकूटावर जडलेला कोहिनूर हिरा भारताची शान आहे. सुरुवातीला हा हिरा दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीकडे होता, त्यानंतर तो मुघल साम्राज्याकडे गेला. पुढे पर्शियन राजाने आक्रमण केल्यानंतर नादिर शाहने कोहिनूर हिरा लुटून अफगाणिस्तानात नेला. १८०९ साली पंजाबचे शीख महाराजे रणजीत सिंग यांच्याकडे हा हिरा आला. तत्पूर्वी हा हिरा विविध राजवंशांकडे गेला होता. यानंतर अखेरीस रणजीत सिंग यांच्या उत्तराधिकारी असलेले राजे दलीप सिंग यांनी ब्रिटीश कालखंडात इंग्रजांकडून राज्य गमावल्यानंतर कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरियाकडे सुपूर्द केला. सुरुवातीला राणी व्हिक्टोरियाने हा हिरा ‘ब्रोच’ म्हणून परिधान केला. त्यानंतर कोहिनूर हिरा ब्रिटनच्या राणीच्या मुकुटाचा एक महत्त्वाचा भाग बनला. दोन हजार ८०० हिऱ्यांनी जडलेल्या या मुकुटाची फ्रेम प्लॅटिनम धातूची असून या मुकुटाच्या समोरचा बाजूला कोहिनूर हिरा लावण्यात आला. महाराणी अँलेक्झांड्रानं कोहिनूरला पहिल्यांदा परिधान केलं, नंतर महाराणी मैरीनं , त्यानंतर महाराणी एलिझाबेथने हा हिरा घातला होता. एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर हा कोहिनूर हिऱ्याचा मुकुट ब्रिटनचे नवीन राजे चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला पार्कर बाउल्स यांच्या डोक्यावर ठेवला जाण्याची शक्यता आहे.
कोहिनूरबाबत अनेक आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत. काहींच्या मते हा हिरा पुरुषांसाठी अपशकुनी आहे, तर महिलांसाठी सौभाग्याचं लेणं! इतर काहींच्या मते ज्याच्याकडे हा हिरा आला, तो नंतर ‘सम्राट’ झाला! काही जणांच्या म्हणण्यानुसार ज्या पुरुषांकडे हा हिरा आला, ते बरबाद झाले. महाराजा रणजित सिंह यांच्याकडे हा हिरा आल्यावर त्यांचं राज्य नष्ट झालं, तर ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता, अशा ब्रिटिशांकडे हा हिरा आल्यावर त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली.
 दरम्यान, कोहिनूर हिरा परत भारतात आणला जाऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कोहिनूर हिऱ्याबाबत भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. कोहिनूर हिरा चोरून किंवा जबरदस्तीने घेतला नव्हता, त्यामुळे भारताने पुन्हा पुन्हा त्यावर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न करू नये, असं भारत सरकारने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!