Just another WordPress site

What is Talaq-E-Hasan : तलाक-ए-हसन म्हणजे काय? तिहेरी तलाक आणि तलाक-ए-हसन मध्ये नेमका फरक काय?

सरकारने २०१९ साली ट्रिपल तलाक बेकायदेशीर ठरवला. मात्र, आजही ‘तलाक-ए-हसन’च्या माध्यमातून तिहेरी तलाक केला जातोय. आता सुप्रीम कोर्टात एक प्रकरण आले, ज्यात एका मुस्लीम महिलेला तिच्या पतीने तलाक-ए-हसन अंतर्गत घटस्फोट दिला. दरम्यान, तलाक-ए-हसन म्हणजे काय? तिहेरी तलाक आणि तलाक-ए-हसन मध्ये नेमका फरक काय? आणि तलाए-ए-हसन ला विरोध का होतोय? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. कोर्टाने २०१९ साली ट्रिपल तलाक बेकायदेशीर ठरवला

२. गेल्या काही दिवसांपासून तलाक-ए-हसनचा मुद्दा चर्चेत 

३. तलाक-ए-हसन हा देखील तिहेरी तलाकचा प्रकार आहे

४. तलाक-ए-हसनला बेकायदा ठरवण्याची होते मागणी 

गेल्या काही दिवसांपासून तलाक-ए-हसनचा मुद्दा चर्चेत आहे. आताही तलाक-ए-हसन विरोधात एका मुस्लीम महिलेनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. जसं ट्रिपल तलाक बेकायदा ठरवला तसा तलाक-ए-हसनला बेकायदा ठरवावे अशी मागणी माजी पत्रकार बेनझीर हीना यांनी कोर्टाला केली. 

तलाकचे प्रकार किती? 

तलाक-ए-हसन म्हणजे काय, हे जाणून घेण्यासाठी आधी इस्लाममध्ये तलाकची पद्धत काय आहे? याविषयी जाणून घेऊ. इस्लाममध्ये तलाक देण्याच्या तीन पद्धती आहेत. पहिली पध्दत आहे, तलाक-ए-अहसान. तलाक-ए-अहसान यामध्ये पती पत्नीला मासिक पाळी नसताना घटस्फोट देऊ शकतो. ते तीन महिन्यांत मागे घेता येतो. याला ‘इद्दत’ म्हणतात. इद्दतचा कालावधी संपल्यानंतरही घटस्फोट रद्द केला गेला नाही तर, तो घटस्फोट कायमस्वरूपी मानला जातो. दुसरी पध्दती आहे तलाक-ए-हसन आणि तिसरी तलाक-ए-बिद्दत.   तलाक-ए-बिद्दतला सामान्य भाषेत तिहेरी तलाक असंही म्हणतात.  यामध्ये पती पत्नीला बोलून किंवा लिहून तीनदा तलाक देऊ शकतो. तीन तलाकनंतर लग्न लगेच तुटतं. आता तिहेरी तलाक देणं बेकायदेशीर आहे आणि असं केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. 


तलाक-ए-हसन म्हणजे काय? 

तलाक-ए-हसन हा तिहेरी तलाकचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये मुस्लीम विवाहांमध्ये पुरुषांद्वारे प्रचलित घटस्फोटाची अतिरिक्त न्यायिक पद्धत स्वीकारली गेली. ज्यामध्ये पती तीन महिन्यांत तीनदा ‘तलाक’ बोलून पत्नीला तलाक देऊ शकतो. अशा प्रकारे, कोणत्याही मुस्लिम पुरुषाने सलग तीन महिने दर महिन्याला एकदा ‘तलाक’ हा शब्द उच्चारल्यास त्या दोघांचा विवाह संपुष्टात येऊ शकतो. यामध्ये देखील पत्नीला मासिक पाळी नसतानाच घटस्फोट दिला जातो. यामध्ये देखील इद्दतचा कालावधी संपण्यापूर्वी तलाक मागे घेता येतो. या प्रक्रियेत घटस्फोटित पती-पत्नी पुन्हा लग्न करू शकतात, मात्र, हे तेव्हाच घडतं, जेव्हा पत्नी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करून त्याच्याशी घटस्फोट घेते. या प्रक्रियेला ‘हलाला’ म्हणतात.


तलाक-ए-हसनला विरोध का होतो? 

अनेक मुस्लिम महिलांनी तिहेरी तलाक अंतर्गत सासरच्या लोकांकडून शारीरिक शोषण आणि हिंसक धमक्या दिल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. याचिकाकर्त्यानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की तलाक-ए-हसनची तरतूद मनमानी आहे. या अंतर्गत एक मुस्लिम पुरुष आपल्या पत्नीला तीन महिन्यांत एकापाठोपाठ एक तीनदा तलाक देतो आणि नंतर घटस्फोट होतो. घटस्फोटाची ही तरतूद मनमानी आणि घटनाबाह्य असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं.  शिवाय हा तलाक बेकायदेशीर, अमानवीय आणि लैंगिक समानतेच्या घटनात्मक हक्काच्या सरळसरळ विरोधातील असल्याचे त्यांचं म्हणणं आहे.  हा तलाक कलम १४, १५, २१ आणि २५ चं उल्लंघन करतो. म्हणजेच ही तरतूद समानतेच्या अधिकाराच्या, जगण्याच्या आणि स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या विरुद्ध आहे. यासाठी केंद्राला मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती मुस्लिम महिलेने केली आहेत. मुस्लीम पर्सनल लॉ ऍप्लिकेशन ऍक्ट, १९३७ चे कलम २ नुसार मुस्लिमांना एकतर्फी तलाक देण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ते रद्द करण्याची मागणी होतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!