Just another WordPress site

Vice President Candidate : भाजपने ज्यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची उमेदवारी दिली, ते जगदीप धनकड आहेत तरी कोण?

आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होतेय. ही निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पुरस्कृत उमेदवारांनी समर्थनासाठी देशभर दौरे केले. असं असताना भाजपने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं. देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा  करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी धनकड यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, जगदीप धनकड आहेत तरी कोण? आणि त्यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी का दिली? याच विषयी जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनकड यांना उमेदवारी

२. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली धनकड यांच्या नावाची घोषणा

३. धनकड यांनी चंद्रशेखर सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले 

४. धनकड यांनी ‘तृणमूल काँग्रेस’ बद्दल घेतलेली भूमिका वादग्रस्त 


जगदीप धनकड यांचा जन्म राजस्थानमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचं सुरुवातीचं शालेय शिक्षण हे गावातच झालं. त्यानंतर सैनिक स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतलं. जयपूरमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी वकिलीचे देखील शिक्षण घेतलेले असून काही काळ त्यांनी सुप्रीम कोर्टात वकिली केली. ते राजस्थानच्या बार काऊंसिलचे चेअरमनही राहिले आहेत. धनकड यांनी जनता दलमधून आपली राजकीय कारकिर्द सुरु केली.  १९८९ ते १९९१ या काळात ते जनता दल पक्षाकडून झुंझूनू मतदारसंघातून खासदार होते.  चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.  राजस्थानमध्ये जाट समुदायाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांचा मोठा हात आहे. १९९१ मध्ये धनकड यांनी जनता दलाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९३ मध्ये काँग्रेसने त्यांना अजमेरमधील किशनगढमधून आमदारकीचं तिकिट दिले होते. त्यांनी भाजपच्या जगजीत सिंह यांचा दीड हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांनी खासदारकीची निवडणूकही लढवली, मात्र, त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पुढे २००३ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ साली त्यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले. राज्यपाल म्हणून काम करतांना त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकार बद्दल वेळोवेळी घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली. ममता बॅनर्जी आणि धनकड यांचे संबंध पराकोटीचे ताणलेले राहिले. पश्चिम बंगाल मधील त्यांची कामगिरी पाहूनच त्यांना भाजपने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्याचं बोलल्या जातं… याचाच भाग म्हणून भाजपने पुढचा विचार करून धनकड यांना उमेदवारी दिल्याचं राजकीय जाणकार सांगतात… जेपी नड्डा यांनी धनकड यांचं नाव घेण्याआधी एक शब्द वापरला, तो होता किसान पुत्र म्हणजेच शेतकऱ्याचा मुलगा. धनकड हे एका सर्वसामान्य कुटुंबातून येतात आणि लोकांशी त्यांची नाळ घट्ट आहे, असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न नड्डांनी केला. कारण, भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष नाही, तर  शेतकरी हित जोपासणारा पक्ष आहे. कृषी कायद्यामुळे निर्माण झालेली प्रतिमा दूर करण्याचा प्रयत्न धनकड यांची निवड करून भाजपकडून केला जातोय. दुसरं म्हणजे, धनकड यांना कायद्याचा चांगला अभ्यास आणि अनुभव आहे. सध्या राज्यसभेत विरोधकांची ताकद जास्त आहे, त्यामुळे राज्यसभेत येणारी विधेयक मंजूर करण्यासाठी धनकड यांच्या राजकीय आणि कायदेशीर ज्ञानाचा फायदा भाजपला भविष्यात होऊ शकतो,  हे देखील धनकड यांनी उमेदवारी देण्यामागचं कारण असल्याचं सांगितल्या जातं… याशिवाय,  राजस्थान आणि हरियाणामध्ये २०२३ आणि २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील. या दोन्ही राज्यात जाट मतदारांची संख्या मोठी आहे. धनकड हे जाट समुदायाचं प्रतिनिधीत्व करत आलेले असल्याने जाट फॅक्टर लक्षात घेऊन भाजपनं त्यांची निवड केली, असं सांगितल्या जातं. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाचा  बहुमान जगदीप धनकड यांना मिळणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!