Just another WordPress site

Sonali Phogat Passes Away: सोनाली फोगाट यांचे निधन, टिक-टॉक स्टार ते भाजप नेत्या त्यांचा हा प्रवास कसा होता?

प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या भाजप नेत्या सोनाली फोगाट  यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ४१ वर्षांच्या होत्या. टिक-टॉक स्टार म्हणून त्यांना ओळखलं जायचं. काही स्टाफ सदस्यांसह त्या गोव्याला गेल्या होत्या. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. दरम्यान, सोनाली फोगाट यांचा  टिक-टॉक स्टार ते राजकारण हा राजकीय प्रवास कसा झाला? याच विषयी जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. टिक टॉकस्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं निधन

२. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने फोगाट यांचं निधन

३. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणात झाला 

४. सोनाली फोगाट यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं


सोनाली फोगाट यांचं गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्यांचा जन्म २१  सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणातील फतेहाबाद इथं झाला. त्यांनी २००६ मध्ये हिस्सार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली होती. दोन वर्षांनंतर २००८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली या सोशल मीडियावर, विशेषतः टिकटॉकवर खूप सक्रिय होत्या. टिकटॉकवर त्यांना १ लाख ३२ हजार युजर्स फॉलो करत होते. दररोज त्या टिक टॉकवर अनेक नव-नवे व्हिडीओ बनवून पोस्ट करायच्या. त्यांना टिक टॉक स्टार म्हणूनही ओळखलं जायचं. बिग बॉसच्या १४ व्या पर्वातही त्यांनी हजेरी लावली होती. या शोदरम्यान त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे अन् गौप्यस्फोट केले होते. पुढं त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. हरियाणातल्या आदमपूर जिल्ह्यातल्या हिसार मतदारसंघातून भाजपने फोगाट यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यांच्यासमोर २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांचं आव्हान होतं. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही त्यांचा निवडणुकीत पराभव झालेला होता. पुढं भाजप हरियाणा प्रदेशच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा संघटनेसाठी व्हावा, यासाठी भाजप प्रयत्नशील होतं. मात्र संघटनबांधणीचं काम मोठं असल्याने सोनाली यांना त्याकामी फारसं यश आलं नाही. सोनाली यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं. त्यांनी ‘अम्मा’ या टीव्ही मालिकेत नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय त्या ‘बंदुक आली जाटणी’ या हरियाणवी गाण्यातही दिसल्या आहेत. त्यांनी ‘द स्टोरी ऑफ बदमाजगढ’ या वेब सीरिजमध्येही काम केलं होतं.   जून २०२० मध्ये सोनाली फोगट यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यांनी एका कृषी अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारली होती. याप्रकरणी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रारीही दाखल करण्यात आली होती. यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यातही अडकल्या होत्या. दरम्यान, काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. यामुळे लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!