Just another WordPress site

Margaret Alva :यूपीएकडून उपराष्ट्रपती पदाची मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर; कोण आहेत मार्गारेट अल्वा?

देशात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय.  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीएचा उमेदवार जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षांनीही रविवारी आपला उमेदवार जाहीर केला. विरोधी पक्षाने मार्गारेट अल्वा  यांना उपराष्ट्रपदाची उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.  या निमित्ताने मार्गारेट अल्वा यांचा राजकीय प्रवासाविषयी जाणून घेऊ. 



महत्वाच्या बाबी 

१. उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

२. शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केली घोषणा

३. त्या राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या 

४. मार्गारेट अल्वा उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या 


मार्गारेट अल्वा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या असून त्यांचा जन्म १४ एप्रिल १९४२ रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे रोमन कॅथोलिक कुटुंबात झाला. त्यांनी बंगळुरूच्या माउंट कार्मेल कॉलेजमधून बीएची पदवी घेतली. तर शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. २४ मे १९६४ रोजी मार्गारेट यांनी निरंजन अल्वा यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आणि तीन मुलं आहेत. १९६९ मध्ये मार्गारेट यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा मार्गारेट अल्वा यांनी इंदिरा काँग्रेससोबत जाणं पसंत केलं. त्यावेळी त्यांनी कर्नाटक इंदिरा काँग्रेससाठी जोरदार काम केलं. त्यांनी १९७५ ते १९७७ दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव आणि १९७८ ते १९८० दरम्यान कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम केलं. एप्रिल १९७४ मध्ये अल्वा काँग्रेसकडून राज्यसभेवर निवडून गेल्या.  यानंतर मार्गारेट यांनी काँग्रेसकडून दीर्घकाळ राज्यसभेच्या सदस्य म्हणून काम केलं. त्यांना काँग्रेसने १९७४, १९८०, १९८६, १९९२ अशा चारवेळी राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं.  १९८३ ते ८५ या कालावधीत त्या राज्यसभेच्या उपसभापतीही होत्या.  पुढं मार्गारेट अल्वा या राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिल्या. संसदीय कामकाज मंत्रालयात त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि युवा-क्रीडा तसेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी पार पडली.  तर राजीव गांधी सरकारच्या काळात  मनुष्यबळ विकास मंत्रालयात काम करताना त्यांनी महिला आणि बालकल्याणासाठी २८ मुद्द्यांच्या कार्यक्रमावर भरीव काम केलं. १९८९ ला मार्गारेट यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाचा प्रस्ताव दिला. त्याचं १९९३ मध्ये कायद्यात रुपांतर झालं. त्यांनी संसदेच्या अनेक समित्यांमध्येही काम केलं. नंतरच्या काळात त्या काही काळ विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीही होत्या. पुढं, १९९९ मध्ये उत्तरा कन्नड मतदारसंघातून १३ व्या लोकसभेत खासदार झाल्या. मात्र, २००४ च्या लोकसभा निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.  त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम केलं. पुढच्या काळात म्हणजे, ६ ऑगस्ट २००९ रोजी मार्गारेट अल्वा उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. यानंतर त्या राजस्थान, गुजरात आणि गोव्याच्या राज्यपाल होत्या. राजकीय अनुभवसंपन्नता, प्रशासनावर उत्तम पकड आणि कायद्याचं उत्तम ज्ञान अशी मार्गारेट अल्वा यांची ओळख आहे. दरम्यान, आता आज १७ विरोधी पक्षाचा पाठींबा असलेल्या मार्गारेट अल्वा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी होतील का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!