Just another WordPress site

Indian Flag : केंद्राकडून देशाच्या ध्वज संहितेत बदल; काय आहेत राष्ट्रध्वज फडकवण्याचे नवे नियम?

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे आयोजन करण्यात आलं.  या अभियाना अंतर्गत केंद्राने भारतीय ध्वज संहितेत काही मोठे बदल केले. या बदलानंतर आता तुम्ही तुमच्या घरी दिवसरात्र तिरंगा फडकवू शकता.  तसेच यापुढे पॉलिस्टर आणि मशीनपासून बनवलेला राष्ट्रध्वजासही वंदन करता येणार आहे. मात्र, भारताची नेमकी ध्वज संहिता काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. घराच्या गच्चीवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन

२. केंद्र सरकारकडून देशाच्या ध्वज संहितेत बदल

३. आता २४ तास मानाने फडकवा येणार तिरंगा

४. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची माहिती 


जेव्हा आपण आपल्या राष्ट्र ध्वजाला सलामी देतो, तेव्हा आपसूकच आपली छाती अभिमानाने फुलून जाते. कारण आपला राष्ट्रीय ध्वज हा  प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक सरकारी ठिकाणी तिरंगी झेंडा फडकवला जातो. मात्र आता सरकारनं ध्वज संहितेत काही बदल केले. केंद्र सरकारची ‘हर घर तिरंगा मोहिमे’अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या घराच्या गच्चीवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं. या मोहिमेसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू केली. यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली. यासाठी केंद्र सरकारने तीन प्रकारचे ध्वज तयार करण्याची व्यवस्था केली.  हे ध्वज पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असतील. तसेच लोक ऑनलाइनच्या माध्यमातूनही तिरंगा खरेदी करु शकतात. दरम्यान, याच माहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या आदेशानंतर भारतीय ध्वज संहितेत सुधारणा करण्यात आली. यामुळं आता दिवसा आणि रात्री असे २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली. त्याचबरोबर पॉलिस्टरपासून तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येईल. एवढचं नाही तर सुधारीत नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा नागरिकांच्या निवास्थानी तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली. याआधी केवळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकाविता येत असे. सूर्य मावळल्यानंतर राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी नव्हती. त्याचबरोबर मशीनवर तयार करण्यात आलेले तसेच पॉलिस्टरचे राष्ट्रध्वजाला परवानगी दिली जात नसे. मात्र, आता या ध्वज संहितेत बदल केल्याची माहिती  केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना पाठवलेल्या पत्रात सांगितलं. भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात सांगितले की, भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवणे आणि त्याचा वापर करणे हे भारतीय ध्वज संहिता २००२ आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ द्वारे नियंत्रित आहे. भारतीय ध्वज संहितेमध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशाद्वारे सुधारणा करण्यात आली असून ध्वज आता रात्रंदिवस फडकवता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!