Just another WordPress site

Increase CIBIL Score : कर्जासाठी चांगला CIBIL स्कोअर गरजेचा; सिबिल रेकॉर्ड चांगला ठेवण्यासाठी काय कराल?

भारतातील सर्वच बँका आता ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सिबिल स्कोर तपासत असतात. त्यामुळे अनेक ग्राहकांना कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होते.  त्यामुळे ग्राहकांना आता त्यांचा सिबिल स्कोर व्यवस्थित ठेवणं महत्वाचं झालं. दरम्यान,  ग्राहकांचा सिबिल स्कोअर बँकांसाठी एवढा महत्वाचा का झाला? सिबिल स्कोअर उत्तम करण्यासाठी काय करायला हवं? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी 

१. आता कर्ज घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे 

२. बँक कर्ज देताना निश्चितपणे सिबिल स्कोर तपासते

३. बँका CIBIL स्कोअर ७५० अधिक चांगला मानतात

४. चांगल्या CIBIL स्कोअरसाठी कर्जाची रक्कम वेळेत भरा 


आजच्या काळात घर बांधण्याचे स्वप्न असो किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची गरज असते. त्यामुळे जर तुम्ही लहान किंवा मोठे कर्ज घेण्याची योजना आखत असाल आणि बँकेने न डगमगता परवडणाऱ्या दरात कर्ज सहज द्यावे अशी तुमची इच्छा असेल, तर तुमचा सिबिल स्कोअर समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण कोणतीही बँक कर्ज देताना निश्चितपणे सिबिल स्कोर तपासते आणि त्या आधारे कर्ज देते.


सिबिल स्कोर चांगला असणं महत्त्वाचं

कर्ज घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे तुमचा सिबिल स्कोर चांगला असणं गरजेचं आहे. बँका नेहमी व्यक्तीचा सिबिल स्कोअर तपासल्यानंतरच कर्ज मंजूर करतात. सिबिल स्कोअरला क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात. याच्या मदतीने बँका तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करता की नाही हे तपासून पाहतात. यासोबतच त्या व्यक्तीने कोणतेही कर्ज भरण्यात चूक केली आहे का हे बँका देखील तपासतात. म्हणजेच कर्ज मागणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती बँकांना त्याच्या सिबिल स्कोअरच्या आधारेच कळते.


अनेकदा प्रश्न येतो की कर्जाचा सिबिल स्कोअर किती असावा? यासाठी कोणतेही निश्चित संख्या नाही. असा कोणताही निश्चित CIBIL स्कोअर नाही ज्याने असे म्हणता येईल की तुमचा हा स्कोअर असेल तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळेल. मात्र बहुतेक बँका CIBIL स्कोअर ७५० आणि त्याहून अधिक चांगला मानतात. 


कर्जाचे हप्ते थकवू नका

खरं तर क्रेडिट स्कोअरच्या मदतीनं बँका पाहतात की,  तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करता की नाही. यासोबतच बँका हे देखील तपासतात की, त्या व्यक्तीने कर्ज भरण्यात चूक केली आहे का. म्हणजेच कर्ज मागणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती बँकांना त्याच्या सिबिल स्कोअरच्या आधारेच कळते.  तुमचा क्रेडिट इतिहास चांगला असेल तरच तुमचा सिबिल स्कोर सुधारेल. म्हणूनच आधी घेतलेलं कर्ज किंवा क्रेडिट कार्डचं बिल तुम्ही योग्य वेळी भरत राहणं महत्त्वाचं आहे.


क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरा

जर तुम्ही कर्जाचा ईएमआय चुकला किंवा बिल प्रलंबित असेल तर त्याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर परिणाम होतो ज्यामुळे तुमचा स्कोअर कमी होतो. जरी तुम्ही क्रेडिट कार्डने खर्च केला आणि वेळेवर बिल भरले नाही, तरी स्कोअरवर वाईट परिणाम होतो. तुम्ही पेमेंट न केल्यास क्रेडिट तपासणी कंपन्या तुमचा स्कोअर कमी करतात आणि कर्जाचे हप्ते भरण्यात चालढकल केल्यास खराब क्रेडिट स्कोअर असेल तर भविष्यात ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.


क्रेडिट कार्डासाठी ढीगभर अर्ज करु नका

तुम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये क्रेडिट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करत असाल तर ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत काहीतरी त्रुटी आहेत, असा समज होऊ शकतो. तुम्ही कोणतेही कर्ज घेता तेव्हा हा तपशील पाहिला जातो. तुम्ही एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डासाठी अप्लाय केले आणि अगोदरच्या क्रेडिट कार्डाचे हप्ते थकवले असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो.


मिनिमम ड्यूजचा पर्याय शक्यतो टाळाच

तुम्ही क्रेडिट कार्डावर एखादी महागडी गोष्ट खरेदी केली तर त्याचे बिल तात्काळ भरा. तुम्ही पूर्ण हप्ता न भरता मिनिमम ड्यूज भरत राहिलात तर कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. एका महिन्याचे व्याज दुसऱ्या महिन्यात ट्रान्सफर होत राहिले तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट युटिलायझेन रेट नेहमी ३० टक्क्यांच्या आसपास राहील याची काळजी घ्या.


वेळेआधी कर्ज फेडण्याची घाई करु नका

तुम्ही एखादे कर्ज वेळेआधी फेडले तर तुम्ही निर्धास्त होता. मात्र, याचा विपरित परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. तुम्ही सिक्योर्ड लोन घेतले असेल तर लोन फोरक्लोझरमुळे क्रेडिट हिस्ट्री कमी होते. तसेच लोन फोरक्लोझरसाठी बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात.

चांगल्या CIBIL स्कोअरसाठी महत्त्वाच्या टिप्स

– कर्जाची रक्कम वेळेवर आणि नियमित भरावी.

– तुमची बिले आणि EMI वेळेवर भरल्याने चांगला स्कोअर मिळतो.

– तुमच्या थकीत रकमेवर एकच डिफॉल्ट तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम करू शकतो.

– काही लोक क्रेडिट कार्डचे बिल पूर्ण भरण्याऐवजी किमान पैसे देतात. याचा क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम  होतो.

– किमान रक्कम भरण्याऐवजी क्रेडिट कार्ड बिलाची पूर्ण रक्कम वेळेवर भरा.


सिबिल स्कोअर कसा तपासायचा?  

ग्राहक त्यांचे CIBIL स्कोअर अगदी आरामात तपासू शकतात. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर विनामूल्य तपासायचा असेल तर तुम्ही https://www.cibil.com वेबसाइटवर क्लिक करू शकता. येथे तुम्ही तुमचे सर्व तपशील आणि पॅन कार्ड क्रमांक टाकून CIBIL स्कोअर तपासू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!