Just another WordPress site

Asha Worker : आशा सेविकांना मोबाइलसह ‘रिचार्ज’ही मोफत; फडणवीस यांची मोठी घोषणा

 

नागपूर : राज्यभरात कार्यरत आशा सेविकांना (Asha Worker) शासनाकडून मोबाईल देण्यात आला आहे. त्यासोबतच रिचार्जसाठी पैसे दिले जाणार आहेत. हा खर्च खनिज निधीमधून केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे केली.

कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात आशा सेविकांना फडणवीस यांच्या हस्ते अँड्रॉईड मोबाईलचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष जयस्वाल, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार कृपाल तुमाने, अभिजित वंजारी, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आशा वर्कर या राज्य सरकारच्या विविध योजना घरोघरी पोहचवतात. त्यांचे काम सोपे व्हावे म्हणून त्यांना मोबाईल देण्यात आले. आता रिचार्जसाठी पैसे दिले जातील. खनिज विकास निधीतून हा खर्च केला जाईल. त्यामुळे आशा वर्कर यांना डेटा नोंदी, रेकॉर्ड ठेवणे सोपे होईल. शिवाय अद्यायावत राहून कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असेही फडणवीस म्हणाले. आशा सेविकांसाठी १० लाखांचा विमा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्षांची नाराजी
जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाचे प्रशासनाकडून नियोजन करताना जिल्हा परिषदेची अध्यक्ष या नात्याने मला विश्वासात घेण्यात आले नाही आणि कार्यक्रमाबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रमुख म्हणून कुठलीही विचारणा करण्यात आली नाही, अशी नाराजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी फडणवीस यांच्या उपस्थितीत व्यक्त केली.

या महिन्यापासून वाढीव मानधन
फडणवीस यांनी आशा सेविकांच्या मानधनात वाढ झाल्याचे सांगितल्यावर सभागृहातून आशा सेविकांनी एकाच आवाजात अजून मिळाले नाही, असे सांगितले. त्यावर फडणवीस यांनी मानधनात लगेच वाढ झाली नसेल तर या महिन्यापासून वाढीव मानधन मिळेल, असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!