Just another WordPress site

AIDS । ए़ड्स म्हणजे काय? काय आहेत गैरसमज? आणि एड्सपासून बचाव कसा कराल?

जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे  साजरा करण्यात येतो. एड्स हा असा आजार आहे, ज्यांच्यावर अद्याप कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडलेला नाही. यापासून बचाव करणं हा या आजारावरील एकमेव उपचार आहे. एड्स म्हणजे काय? एड्सची काय लक्षणे आहेत ? एड्सपासून बचाव कसा करावा? याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.



एड्स दिनाचा इतिहास काय आहे? 

एड्सहा एक असाध्य रोग आहे. याला आळा घालण्यासाठी सध्याच्या घडीला जनजागृती हाच एकमेव पर्याय आहे. या जीवघेण्या आजारापासून लोकांना वाचवण्यासाठी १  डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांचा संकल्पना मांडली होती. त्यानंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून आणि थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला. जगात सगळ्यात पहिले १९८१ साली अमेरिकेत एड्सचा पहिला रूग्ण आढळला होता. तर भारतामध्ये १९८६ साली पहिला HIV बाधित रुग्ण आढळला होता. 


एड्सची काय आहेत लक्षणे?

एड्सची पहिली लक्षणे म्हणजे इन्फ्लूएंझा सारखी लक्षणे किंवा सूजलेल्या ग्रंथी असू शकतात. मात्र काही वेळा लक्षणे दिसू शकत नाहीत. दोन किंवा तीन महिन्यांनंतर लक्षणे दिसू शकतात. घसा खवखवणे, स्नायू दुखणे, पुरळ, तोंड किंवा जननेंद्रियाच्या अल्सर, डोकेदुखी, ताप, मुख्यत: मान वर सूजलेल्या लिम्फ ग्रंथी, सांधे दुखी, अतिसार, रात्री घाम येणं ही एड्सची लक्षणे असू शकतात.

एड्स होण्याची कारणे काय? 

एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो असे नाही तर ज्याला एड्स रोग झाला त्या व्यक्तीचं रक्त जर तुमच्या शरीरात गेलं तरी  एड्स होऊ शकतो. किंवा एड्स बाधीत व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो. HIV बाधित आईकडून स्तनपान करताना मुलाला होऊ शकतो.  याशिवाय असुरक्षित लैंगिक संबंधामुळे देखील एड्स होऊ शकतो.


एड्स आजाराविषयी असलेले गैरसमज

पूर्वी एड्स या आजाराबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज होते. मात्र, आता या आजाराशी संबंधित अनेक गैरसमज लोकांच्या मनातून काहीसे दूर झालेले दिसतात. मात्र, मागासलेल्या देशांबद्दल बोलायचं झालं तर या देशांची परिस्थिती अजून सुधारलेली नाही. आजही एड्स आजाराविषयी  अनेक गैरसमज आहेत. एड्स या असाध्य, अपरिचित असा रोगाविषयी चुकीचे गैरसमज बाळगणे हे सुद्धा समाजाच्या दुष्टीने घातक आहे.  हा रोग संसर्गजन्य रोग असल्याचा गैरसमज सर्व साधारण नागरिकांच्या मनात आहे. मात्र,  हा संसर्गजन्य रोग नाही आहे. त्यामुळे रोगाच्या बाधित रूग्णाच्या सोबत राहणे, जेवणे, खेळणे, स्पर्श करणे, कपडे वापरणे, बाजूला झोपणे, मिठी मारणे, चुंबन, शिंका येणे  शौचालयाचा वापर करणे या सगळ्या कारणामुळे या महाभयंकर रोगाची लागण होत नाही.


एचआयव्हीपासून बचाव कसा कराल?

एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी जागरुकता अत्यंत आवश्यक आहे. 

१. एखाद्या व्यक्तीला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई पुन्हा वापरू नये.

२. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे.

त्यासाठी  कोंडोमसारख्या साधनांचा वापर करावा.

३. एखाद्या व्यक्तीने वापरलेलं ब्लेड शेविंग करण्यासाठी वापरू नये. 

याशिवाय,  गेल्या काही वर्षांत HIV ला तोंड देण्यासाठी PrEP नामक उपचार पद्धतही जगभरात काही देशांत वापरली जाते. ही गोळी रोजच्या रोज अथवा सेक्स होण्यापूर्वी काही काळ आधी घेतल्यास HIV चा संसर्ग टाळता येऊ शकतो.

हेही वाचा –  कर्जत नगरपंचायत : रोहित पवार विरुद्ध राम शिंदे लढत रंगणार; मतदार कोणाला कौल देणार ?

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!