एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाने एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली होती. या धक्कादायक घटनेमुळं संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा याला तो नोकरी करत असलेल्या कंपनीने कामावरून काढून टाकलेय. तसेच त्याला अटकही करण्यात आली. दरम्यान, विमानात दिल्या जाणाऱ्या दारूबाबत काय धोरण आहे? विमानात दारू का दिली जाते? किती दारू दिली जाते? याच विषयी जाणून घेऊ.
आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात का दिली जाते दारू?
देशांतर्गत विमानाचा प्रवास असो वा आंतरराष्ट्रीय विमानातला प्रवास तेथे कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात, याची माहिती अनेकजण मिळवत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आंतरराष्ट्रीय विमानात प्रवास करताना असं एक पेय प्रवाशांना सहज मिळू शकतं, जे विमानात देशांतर्गत प्रवास करताना दिलं जात नाही. ते पेय म्हणजे दारू. तुम्ही जर आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास केला असेल, तर तुम्ही पाहिले असेल की, या विमानात लोकांना दारू सुद्धा मिळू शकते. मात्र, देशांतर्गत विमान प्रवास करताना प्रवाशांना दारू मिळत नाही? असं का होतं? तर नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांमध्ये दारू पिण्यावर बंदी घातल्यानं देशांतर्गत विमानात दारु मिळत नाही. सध्या दारू फक्त आंतरराष्ट्रीय विमान प्रवासातच दिली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय विमानात प्रवास करताना दारू का दिली जाते, यामागेही वेगवेगळे तर्क सांगितले जातात. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना ताजंतवानं वाटण्यासाठी दारू दिली जाते. याशिवाय, एका मर्यादित प्रमाणात दारूचं सेवन केल्याने लोकांना झोप चांगली येते, आणि त्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास सहज पूर्ण होतो. त्यामुळे दारू फक्त प्रवाशांच्या आरामासाठी दिली जाते. यातही १८ वर्षांच्या वरील व्यक्तींनाच दारू दिली जाते.
किती दारू दिली जाते?
फ्लाइटमध्ये प्रवाशांना त्यांच्या जागेवरच ड्रिंक सर्व्ह केलं जातं. प्रवाशांना स्वतः आणलेली दारू पिण्याची मनाई असते. थोडक्यात काय तर बाहेरचे मद्य प्रवाशांना विमानात आणता येत नाही. महत्वाचं म्हणजे, प्रवासादरम्यान विमान कंपन्यांकडून किती मद्य दिले जावे, याचेही नियम ठरलेले आहेत. एअर इंडियाच्या नियमानुसार प्रवाशांना एका वेळी एकच पेग दिला जातो. जर बिअर असेल तर एक ३५० मिली बिअर दिली जाते आणि जर वाईन असेल तर ३० मिली एवढीच वाईन मिळते. आणि जर विस्की किंवा रम असेल तर एक छोटी बाटली प्रवाशांना दिली जाते.
विमानात दारू पिण्याचे नियम काय?
एअर इंडियाच्या नियमानुसार, जर एखाद्या विमानाचं उड्डाण हे ४ तासांहून कमी कालावधीचं असेल तर दोन पेक्षा जास्त ड्रिंक देता येत नाहीत. फक्त दोनच ड्रिंक देण्याची परवानगी आहे. आणि जर प्रवास हा चार तासांपेक्षा जास्त काळाचा असेल तर तासाच्या हिशोबाने प्रवाशांना ड्रिंक दिलं जातं. म्हणजेच चार तासांचा प्रवास असेल तर केवळ दोनच ड्रिंक आणि सहा तासांचा प्रवास असेल तर चार ड्रिंक दिले जातात. याशिवाय, असाही एक नियम आहे की, जर एखाद्या प्रवाशाचे तीन ड्रिंक झाले असतील तर त्याला तीन तासांपर्यंत कोणत्याही प्रकारची दारु देता येत नाही. तीन तासांचा ब्रेक घेतल्यानंतर त्याला पुन्हा दारू दिले जाऊ शकते. मात्र बिझनेस क्लासमधील प्रवाशांना हा नियम लागू होत नाही. याशिवाय, जर क्रू सदस्यांना वाटलं की, एखादा प्रवासी हा नशेच्या जास्तच अमलाखाली गेलाय, तर त्याला पुढचे ड्रिंक देण्यास क्रू सदस्यांकडून नकार दिला जाऊ शकतो. मात्र, हे क्रू सदस्याच्या त्यावेळच्या निर्णयप्रक्रीयेवर अवलंबून असते.