Just another WordPress site

Drugs : कारवाई करून हस्तगत केलेल्या अमली पदार्थांचं पुढे काय होतं? अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी तरतूदी काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आभासी उपस्थितीत ३० हजार किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. ही कारवाई दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता या चार शहरांमध्ये करण्यात आली.  ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा भाग म्हणून १ जूनपासून अमली पदार्थ निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, जप्त केलेले अमली पदार्थांच पुढं काय होतं? ते नष्ट करण्यासाठी कायदेशीर तरतूद काय आहे?



महत्वाच्या बाबी 

१. एनसीबीची १ जूनपासून ड्रग डिस्पोजल मोहीम सुरू 

२. एनसीबीने नष्ट केलं ३०,०००  किलो अमली पदार्थ

३. तपास यंत्रणांना अमली पदार्थ नष्ट करण्याचा अधिकार 

४. दोन वर्षात  ७५ हजार किलो अमली पदार्थ केले जप्त 


नारकोटीक्स ड्रग्स अँड सायकोट्रापिस सब्सटेंट अॅक्ट म्हणजेच एनडीपीएस अॅक्ट १९८५ आणि एनडीपीएस अॅक्ट १९८८ हे भारतात लागू असलेले दोन मुख्य कायदे आहेत. या कायद्यांनुसार नारकोटिक्स ड्रग्स किंवा कुठलेही अमली पदार्थ जवळ बाळगणे, विकणे, खरेदी करणे, त्यांचा व्यापार आणि आयात-निर्यात करणं हे गुन्हा ठरतात. याच कायद्याच्या आधारे  दररोज किती तरी ड्रग्ज, अमली पदार्थ जप्त करण्यात येतातत. अमली पदार्थ विरोधी दलाने देशभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून दोन वर्षात  ७५ हजार किलो अंमलीपदार्थ जप्त केले. 


जप्त केलेले ड्रग्सचं पुढ काय होतं? 

नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा, १९८५ च्या कलम ५२ नुसार, तपास यंत्रणांना त्यांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे. ज्या तपास यंत्रणांना ड्रग्स जप्त करण्याचे अधिकार आहेत, त्या प्रत्येक एजन्सीला स्थानिक दंडाधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीने जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट करण्याचा अधिकार आहे. मात्र, या जप्त केलेल्या अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यापूर्वी तपास अधिकाऱ्यांना नष्ट करण्यात येणाऱ्या अमली पदार्थांची तपशीलवार यादी तयार करावी लागते. जप्त केलेले अमली पदार्थ नष्ट करण्यापूर्वी संबंधित क्षेत्राचे एसएसपी, अधीक्षक किंवा एनसीबीचे प्रतिनिधी, स्थानिक दंडाधिकारी आणि कायद्याशी संबंधित दोन व्यक्तींचा समावेश असलेली पाच सदस्यीय समिती स्थापन करावी लागते. त्यानंतर समितीच्या समक्ष जप्त केलेले ड्रग्स नष्ट केले जातात. हे ड्रग्स पूर्णपणे नष्ट करावे लागतात. या कारवाईत कणभर ड्रग्सही मागे राहता कामा नये, असा नियम आहे.


ड्रग्स नष्ट करण्यासाठीची प्रक्रिया काय? 

अंमली पदार्थ विरोधी पथक वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सतत जप्त करत असतं.  जे अंमली पदार्थ जप्त करण्यात येतात, ते केसमध्ये गरज असेपर्यंत एकत्रीत साठवले जातात, त्यानंतर साठवलेले अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात येतात. या जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी एजन्सी सर्वप्रथम स्थानिक न्यायालयाकडून परवानगी घेते. त्यानंतर कडेकोट बंदोबस्त ठेवून हे अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी ठरवून दिलेल्या ठिकाणी नेले जातात. संबंधित ठिकाणी गेल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्याकडून घटनास्थळी आणलेल्या अमली पदार्थांची मोजणी केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी केली जाते. त्यानंतर एकामागून एक अमली पदार्थांचे सर्व पॅकेट्स, गोनी किंवा पिशव्या आगीत टाकल्या जातात. नियमानुसार, जप्त केलेले सर्व अमली पदार्थ नष्ट होईपर्यंत समिती सदस्यांना घटनास्थळावरून कुठेही जाता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!