Just another WordPress site

Draupadi Murmu : भाजपने ज्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची उमेदवारी दिली, त्या द्रौपदी मुर्मू आहेत तरी कोण?

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच भाजपनं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी घोषीत केली.  भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. यावेळेसचा राष्ट्रपती उमेदवार हा देशाच्या पूर्व भागातला असावा, तसंच तो आदिवासी असावा एवढच नाही तर ती महिलाही असावी अशी चर्चा झाली आणि या सर्व बाबी द्रोपदी मुर्मू पूर्ण करतात. त्यामुळेच त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं नड्डा यांनी सांगितलं. दरम्यान, द्रोपदी मुर्मू आहेत तरी कोण? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय? याची अनेकांना उत्सुकता आहे.



महत्वाच्या बाबी 

१. भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी

२. भाजपचे जे. पी. नड्डा यांनी केली मुर्मू यांच्या नावाची घोषणा 

३. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत

४. द्रौपदी मुर्मू या दोन टर्म आमदारही राहिलेल्या आहेत

द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. २०१५ ते २१ या काळात मुर्मू झारखंडच्या राज्यपाल होत्या. त्यांचा जन्म २० जून १९५८ ला ओडिशा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक म्हणून कामाला सुरूवात करून ओडिशाच्या सिंचन विभागात नोकरी करत होत्या. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर रायरंगपूर मतदारसंघातून आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायरंगपूर नगर पंचायत मधून नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या. भाजपमध्ये त्यांनी जिल्हा अध्यक्षा यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.  नंतर त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ ते २०१५ मध्ये काम केलं. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. विशेष म्हणजे द्रौपदी मुर्मू यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र शोकांतिकेनं भरलेलं आहे. मुर्मू यांच्या पतीचं निधन झालेलं आहे. एवढच नाही तर त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झालाय. सध्या त्यांच्या कुटूंबात त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्या राष्ट्रपती झाल्या तर आदिवासी समुदायाला एक मोठं स्थान देशाच्या राजकारणाला मिळेल. तसंच ते नरेंद्र मोदींची प्रतिमेला उजाळा देण्यासाठी उपयुक्त ठरेल.  दरम्यान, पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांना बहुमान मिळाला होता. आता असाच बहुमान द्रौपदी मुर्मू  यांना मिळणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!