Just another WordPress site

भारतातील ‘या’ कंपनीची ४ औषधं जीवघेणी; औषधं घेतल्यानं ६६ मुलांचा मृत्यू!, WHO ने केला दावा

सर्दी-खोकला ही लहान मुलांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे. बहुतेक लहान मुलांना वारंवार सर्दी-खोकला होत असल्याचं तुम्ही बघितलं असेल. परिणामी, अशा मुलांचे पालक घरामध्ये एखादं कफ सिरप कायम ठेवतात. मात्र, हेच कफ सिरप जीवघेणं ठरलं तर? आफ्रिका खंडातील गांबिया या देशामध्ये अशी घटना घडल्याचा दावा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेनं मेडेन फार्मास्युटिकल्सनं बनवलेल्या चार खोकला आणि सर्दी सिरपबाबत हा दावा केला असून हे सिरप न वापरण्याचा इशारा दिला.

 

महत्वाच्या बाबी

१. सर्दी-खोकला ही लहान मुलांमध्ये दिसणारी सामान्य समस्या
२. खोकल्याच्या औषधामुळे ६६ मुलांनी गमावला जीव – WHO
३. कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या किडनीवर परिणाम होऊन मृत्यू
४. WHO ने मेडेन फार्मास्युटिकल्सच्या उत्पादनाबाबत दिला अलर्ट

 

जागतिक आरोग्य संघटननेने भारतात बनवल्या जाणाऱ्या कफ सिरपवरुन एक महत्त्वाचा अलर्ट जारी केलाय. कफ सिरपमध्ये असलेल्या काही घटकांचं प्रमाण हे लहान मुलांसाठी घातक ठरत असल्याचं दिसून आलंय. भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपवरुन हा अलर्ट जारी करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत ६६ कोवळ्या जिवांच्या मृत्यूला हे कफ सिरप कारणीभूत ठरल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. त्यानंतर पुढील तपास करण्यासाठी अलर्ट जारी करत सगळ्यांना सतर्क करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे सर्दी-खोकला किंवा ताप आल्यानंतर लहान मुलांना एक सिरप देण्यात आलं होतं. या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली.

डब्ल्यूएचओने त्यांच्या वैद्यकीय उत्पादन अहवालात दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेच्या चाचण्यांदरम्यान, मेडेन फार्मास्युटिकल्सच्या खोकला आणि सर्दी सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची जास्त मात्रा आढळली, जे धोकादायक आहे. यासोबतच डब्ल्यूएचओने अहवालात या उत्पादनाबाबत लोकांना अलर्ट जारी केला. हा प्रकार आतापर्यंत फक्त गांबियामध्ये निदर्शनास आला. अशीच औषधं इतर देशांमध्येही वितरित केली गेल्याची शक्यता आहे. या प्रकरणाबाबत डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितलं की, या चार औषधांमध्ये मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेडनं भारतात बनवलेल्या खोकला आणि सर्दी सिरपचा समावेश आहे. डब्ल्यूएचओ रुग्णांना पुढील हानी टाळण्यासाठी सर्व देशांमध्ये अशी उत्पादनं शोधून काढून ती टाकण्याची शिफारस करतो, असं नमूद केलंय.

या रिपोर्टनुसार बुधवारी या औषधांबाबत आणि त्यामुळं होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल इशारा जारी केला. ज्या चार सिरपबाबत इशारा दिला आहे, त्यात प्रोमेथाजिन ओरल सोल्युशन, कोफेक्समालिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन कोल्ड सिरपचा समावेश आहे. आरोग्य संघटनेनं सांगितलं की, या औषधांमध्ये ज्या पदार्थांचा वापर केला गेला ती विषारी आणि धोकादायक ठरू शकतात. या औषधांच्या सेवनामुळं पोटात दुखणे, उलटी, मूत्रपिंडाचा आजार, डोकेदुखी याचा त्रास होऊ शकता. विशेषत: ही औषधं लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. यामुळे ते घेणाऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत होऊ शकते. त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशी कोणतीही औषधं वापरू नयेत. यामुळं मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.

दरम्यान, मेडेन फार्मास्युटिकल्सनं यावर आरोग्य संघटनेनं केलेल्या दाव्यावर भाष्य करण्यास नकार दिलाय. मात्र, डब्ल्युएचओनं केलेल्या दाव्यामुळे भारतीय औषध निर्मिती उद्योगात खळबळ उडाली. दिल्लीतील महत्त्वाच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले. त्यामुळं या चौकशीतून काय समोर येतं हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!