Just another WordPress site

Who administers the oath to the President? राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतं? अन् राष्ट्रपती २५ जुलैलाच शपथ का घेतात?

आज देशाला नवे राष्ट्रपती मिळणार असून बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. तर यशवंत सिन्हा यांनी लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी मतदान करण्यासंदर्भात आवाहन केलं होतं. त्यामुळे आता नेमकी मतमोजणी झाल्यानंतर निकाल काय लागणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं. द्रौपदी मुर्मू किंवा यशवंत सिन्हा यांच्यापैकी एक उमेदवार राष्ट्रपती पदाची शपथ घेईल. भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक मानले जातात. केंद्रातील सर्व मंत्र्यांना राष्ट्रपती शपथ देतात. तर मग, खुद्द राष्ट्रपतींनाच त्यांच्या पदाची शपथ कोण देतं? याची अनेकांना उत्सकुता आहे.



महत्वाच्या बाबी 

१. द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातो

२. राष्ट्रपती पदाच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष

३. देशाचे  सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात  

४. पहिल्यांदा २५ जुलैला रेड्डी यांनी घेतली शपथ 


भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपतींची पात्रता, राष्ट्रपतींच्या जबाबदाऱ्या, त्यांचा शपथविधी, राजीनामा, महाभियोग पक्रिया याविषयी माहिती दिलेली आहे. राष्ट्रपती पदाच्या शपथ विधीविषयीची माहिती राज्यघटनेच्या कलम ६० मध्ये मिळते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराला पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. अपवादात्मक स्थितीत जर देशाचे सरन्यायाधीश या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थितीत असतील तर, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती राष्ट्रपतींना पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात. भारतीय राज्य घटनेत राष्ट्रपतींची शपथ नेमक्या कोणत्या दिवशी घेतली जावी याबाबत कोणताही उल्लेख नाही. दर पाच वर्षांनी २५ जुलै रोजी देशाला एक नवीन राष्ट्रपती मिळतो. ही मालिका १९७७ पासून सुरू झाली. त्याचं झालं असं की, तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे त्यांच्या कार्यकाळात फेब्रुवारी १९७७ मध्ये निधन झाले, तेव्हा त्यांच्या निधनानंतर  बी. डी. जत्ती हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले. त्यानंतरच्या पुढील काही महिन्यांतमच म्हणजे,  १९७७ मध्ये निलम संजीव रेड्डी बिनविरोध विजयी झाले होते, २५ जुलै १९७७ रोजी निलम संजीव रेड्डी यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. तेव्हापासून प्रत्येक राष्ट्रपतीने आपला कार्यकाळ पूर्ण केलाय. प्रत्येक राष्ट्रपतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपतो. यामुळं २५ जुलै रोजी नवीन राष्ट्रपती शपथ घेतात. आजवर  २५ जुलै रोजी तब्बल नऊ राष्ट्रपतींनी शपथ घेतली. आताही सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार असल्यानं नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा २५ जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपतींचा मृत्यू झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणाने हे पद रिक्त राहिल्यास उपराष्ट्रपती हा पदभार घेतात. जेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीपदाची सूत्रे घेतात, त्याआधी त्यांना या पदाची शपथ घ्यावी लागते. ही शपथ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात. त्यावेळी जर उपराष्ट्रपती पदही रिक्त असेल तर ही जबाबदारी देशाचे सरन्यायाधीश सांभाळतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!