Just another WordPress site

छत्रपती शाहू महाराजांचे ‘हे’ वंशज उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, भाजपला धक्का

धुळे : धुळे जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी हातात शिवबंधन बांधण्याचे निश्चित केले आहे. आज सायंकाळी मातोश्रीवर त्यांचा हा प्रवेश सोहळा होणार असून या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रभावी कामामुळेच आपण शिवसेनेत जात असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान ही घटना भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का मानला जातो आहे.

धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. त्यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी विधी शाखेची पदवी घेतली असून ते आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे गेले होते. याच वेळी ते प्रवेश करणार असल्याचे देखील पुढे आले आहे. यशवर्धन कदमबांडे हे यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करत असल्याच्या वृत्ताला यशवर्धन कदमबांडे यांनी दुजोरा दिला असून हा निर्णय आपण वैयक्तिक घेतला असून या संदर्भात त्यांचे वडील राजवर्धन कदमबांडे हे त्यांचा कोणताही निर्णय लादत नाहीत. त्यामुळे आपण स्वतः शिवसेनेत कार्यरत होण्याचा निर्णय घेतला आहे. आपण प्रत्यक्ष राजकारणात यापूर्वी सक्रिय नव्हतो. मात्र आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माध्यमातून प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामामुळे आपण प्रभावित झालो असून शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमीच संधी दिली जाते. जात पात न पाहता केवळ कर्तुत्व पाहिले जाते. तसेच शिवसेनेत शब्द कायम पाळला जातो. कुणालाही फसवले जात नाही. त्यामुळे आपण शिवसेनेत कार्यरत होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!