Just another WordPress site

धनुष्यबाणाविषयी आता निवडणूक आयोग घेणार निर्णय, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार?

आपणच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखलं जावं, अशी उद्धव ठाकरेंच्या वतीने मागणी करण्यात आली होती. ती मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. दरम्यान, धनुष्यबाणाविषयी निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला. त्यामुळं निवडणूक आयोग काय निर्णय घेतं, याची अनेकांना उत्सुकता लागली.

 

महत्वाच्या बाबी

१. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास SC चा नकार
२. धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मोकळे
३. आता दोन निकषांच्या आधारे निवडणूक आयोग निर्णय देणार
४. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता

 

धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, या वादाचा चेंडू आता निवडणूक आयोगाच्या दारात गेलाय. न्यायालयाचा निकाल हा एकनाथ शिंदे यांना दिलासादायक मानला जात असला तर, हा निर्णय ठाकरेंची धाकधूक वाढवणारा आहे. त्यामुळं ठाकरेंसमोर धनुष्यबाण हे पक्षचिन्ह टिकवण्याची कसोटी आहे.
खरंतर एखाद्या पक्षात फूट पडली, तर निवडणूक आयोग दोन्ही बाजूंच्या दाव्यांची तपासणी करुन दोन निकषांच्या आधारे आपला निकाल देतो. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या गटाकडे आमदार आणि खासदारांचे बहुमत आहे. तर दुसरी बाब म्हणजे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत कोणाच्या बाजूने बहुमत आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय सर्व गटांना बंधनकारक असतो. म्हणजेच तो ठाकरे किंवा शिंदे या दोन्ही गटांना अमान्य करुन चालणार नाही.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी तीन शक्यता बोलल्या जातात. त्यातील पहिली शक्यता म्हणजे, धनुष्य बाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळू शकतं. तर शक्यता दुसरी अशी वर्तवली जाते की, धनुष्य बाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळू शकतं. शक्यता तिसरी अशी आहे की, निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतील, तर निवडणूक आयोग प्रमुख पक्षाचे चिन्ह गोठवतो. त्यामुळं ठाकरे किंवा शिंदे यापैकी कोणालाही धनुष्यबाण नाही. गेल्या पन्नास-साठ वर्षांच्या राजकीय इतिहासाचा पाहिला तर अशा प्रकारची अनेक उदाहरणे समोर येतील. राष्ट्रीय काँग्रेसचे प्रथम ‘बैलजोडी’ चिन्ह १९६९ साली गोठविण्यात आले, त्यानंतर काँग्रेसला दिलेले ‘गाय वासरू’ चिन्ह देखील गोठविण्यात आले. त्यानंतर काँग्रेसला ‘हाताचा पंजा’ हे चिन्ह दिले. १९८० जनता पक्षात फूट पडली त्यावेळी नांगरधारी शेतकरी हे चिन्ह गोठविण्यात आले. त्यानंतर भारतीय जनता पार्टी या नव्या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला कमळ चिन्ह देण्यात आलं. हा इतिहास पाहता निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाण्याचीच शक्यता अधिक असल्याचं जाणकार सांगतात.
आता मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही तोंडावर आहे. अशात निवडणूक आयोगाचा निर्णय होण्याआधीच निवडणूक लागली, तर दोन्ही बाजूंना धनुष्यबाणाशिवाय रिंगणात उतरावं लागेल. असं झालं, तर मग फायदा उद्धव ठाकरेंचा होईल की एकनाथ शिंदेंचा, असाही प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी ठाकरेंसाठी एक फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे, शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंना सीएमपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यांतर शिवसेवरच दावा केला. त्यामुळं ठाकरेंच्या अडचणी वाढताहेत. त्यामुळं शेवटच्या फळीतील घटक असलेला मतदाराची सहानुभूत ठाकरेंच्या बाजूनं आहे. शिंदे निर्माण करत असलेल्या अडचणी ठाकरेंसाठी नवसंजीवनीच ठरतील, असं जाणकार सांगतात. मात्र, सहानुभुती किती काळ राहते आणि टिकली तर तिचं मतात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जमिनीवर शिवसैनिकांचं नेटवर्क सोबत राहतं का, यावरच सगळं भवितव्य अवलंबून आहे.
दरम्यान, आगामी काळात मुंबई महापालिकेसह राज्यभरात अन्य निवडणुका तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेते हेच पाहणं महत्वाचं आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!