Just another WordPress site

‘त्या’ एका पत्रामुळं सुरू झाले रेल्वेच्या प्रत्येक डब्यात टॉयलेट; रेल्वेत टॉयलेटची सुविधा कधीपासून करण्यात आली?

भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जातेय. जागतिक पातळीवरील रेल्वे जाळ्यात भारताचा वरचा क्रमांक लागतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का, की आज आपण ज्या स्वरुपात भारतीय रेल्वे पाहतो, ती पूर्वी तशी नव्हती. भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर बरीच वर्षे तिच्यात शौचालयाची व्यवस्थाच नव्हती. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, रेल्वेच्या डब्यात शौचालय केव्हापासून अस्तित्वात आलेत? रेल्वेत शौचालयाची सुविधा कशी सुरू झाली? तर याच विषयी जाणून घेऊ.

तुम्ही सगळ्यांनीच आयुष्यात एकदा तरी रेल्वेनं प्रवास केलाच असावा. हा प्रवास कमी खर्चीक असतो. तसेच यामुळे तुम्ही तुमच्या ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकता. हा प्रवास गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्याच खिशाला परवडणारा आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेनं प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल की एका बोगीत किंवा एका डब्यात टॉयलेट असतात. जे लांबचा प्रवास करताना प्रवाशांसाठी खरंच खुप फायद्याचं आहे. भारतात पहिली पॅसेंजर ट्रेन १६ एप्रिल १९५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. मात्र, रेल्वेमध्ये ही टॉयलेटची सुविधा आधीपासून नव्हती. शौचालयाची सुविधा नसल्याने रेल्वेने प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणी यायच्या. भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर जवळपास ५६ वर्षांनंतर, भारतीय रेल्वेमध्ये शौचालाची व्यवस्था सुरू करण्यात आली. याचं सगळं श्रेय जाते, ओखिल चंद्र सेन नावाच्या एका बंगाली व्यक्तीला. त्यांच्याच एका तक्रारीनंतर रेल्वेमध्ये शौचालयाची सुविधा सुरू करण्यात आली. ही गोष्ट आहे १९०९ मधील. त्याचं झालं असं की, ओखिल चंद्र सेन हे बंगाली बाबू रेल्वेतून प्रवास करत होते. अनेक तास एकाच जागी बसल्यामुळे तसंच उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास होऊन त्यांची तब्येत बिघडली. पोटात खूप दुखू लागले. अपचनाचा त्रास होऊ लागला. गाडी अहमदपूर रेल्वे स्थानकावर थांबली आणि ओखिल चंद्र सेन यांनी स्थानकावरून पाण्याने भरलेला लोटा घेतला आणि तडक आडोसा गाठला. काही क्षणात रेल्वेच्या गार्डने गाडी सूटण्याची सूचना करणारी शिटी वाजल्यामुळे ओखिल चंद्र सेन आपले धोतर सांभाळत तसेच उठून धावत आले. ते रेल्वेच्या डब्यात चढणार इतक्यात धोतरात पाय अडकून ते प्लॅटफॉर्मवर पडले. तेव्हा त्यांचे धोतरही सुटलेय. यामुळं त्यांची चांगलीच फजिती झाली. त्यांची ट्रेन देखील सुटली होती. त्यामुळं त्यांना स्टेशनवरच थांबावे लागले होतं. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ साहिबगंज रेल्वे मंडळाला पत्र लिहिलं आणि घडलेल्या घटनेबाबत सविस्तर सांगितलं. एखादी व्यक्ती स्थानकावर शौचालयाला गेली असेल, तर रेल्वेचा गार्ड पाच मिनिटेही गाडी थांबवू शकत नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. संबंधित रेल्वे गाडीच्या गार्डला दंड करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी आपल्या पत्रात केली होती. एवढंच नाही तर, रेल्वेने पत्राची दखल घेऊन मागणी पूर्ण केली नाही, तर मी ही सर्व घटना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. रेल्वेने या पत्राची गांभीर्याने दखल घेतली आणि पुढीन दोन वर्षांत रेल्वे गाडीच्या प्रत्येक डब्यात शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. ओखिल चंद्र सेन यांचे ते पत्र दिल्लीतील रेल्वे म्युझियममध्ये आजही सांभाळून ठेवण्यात आलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!