Just another WordPress site

Rasawanti Gruh : उसाच्या रसवंती गृहाला नवनाथ किंवा कानिफनाथ हेच नाव का असतं? नेमकं त्यामागचं कारण काय?

फेब्रुवारी महिना संपला अन् उन्हाळा सूरू झाला. उन्हाच्या कडाक्यामुळे जीवाची लाही लाही होते, म्हणून माणूस थंड पेय  शोधू लागतो. उन्हाळ्यातील सर्वात आवडते शीतपेय म्हणजे उसाचा रस. उन्हाची दाहकता वाढली कि माणूस छुन-छुन आवाज करणाऱ्या उसाच्या रसवंतीगृहाचा शोध घेऊ लागतो. आणि उसाचा रस पिऊन जीवाला शांत करतो. थंडीच्या दिवसात अमृततुल्यवर होणाऱ्या चाय पे चर्चावाल्या गरम चर्चाचे फड उन्हाळ्यात नवनाथ रसवंती गृहावर बसू लागलात.   मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की,  रसवंतीगृहांना शक्यतो नवनाथ किंवा कानिफनाथ हि नावेच का असतात? चला तर याच विषयी जाणून घेऊया.



ऊस पट्ट्यातलं कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली असो की विदर्भा सारख्या दुष्काळी भागातील वाशीम, मालेगाव असो की, आडवाटंवरचं एखादं खेडं गाव असो. महाराष्ट्रातील प्रत्येक स्टॅण्डवर रसवंती गृह असते. त्यात नवनाथांचे चित्र लावलेलं असतं. अन् त्या रसवंतीगृहाला नवनाथ तर  कधी कधी कानिफनाथ रसवंतीगृह असं नाव असतं. खरंतर रसवंती गृह व्यवसायामध्ये असणारे जवळपास  नव्वद टक्के व्यावसायिक हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि  भोर तालुक्यातले आहेत.  नाथ संप्रदायाचा या भागातील लोकांवर जास्त प्रभाव आहे.  तसेच पुरंदर तालुक्यामध्ये सासवड पासून १२ किलोमीटरवर बोपगाव या ठिकाणी श्री कानिफनाथ यांची समाधी आहे. त्यामुळं अख्खा पुरंदर तालुका कानिफनाथांचा भक्त आहे. हे लोक श्रद्धेने रसवंतीगृहाला कानिफनाथ किंवा नवनाथांचे नाव आपल्या दुकानाला देतात. खरंतर पुरंदर तालुक्यातील बोपगाव हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या मानानं दुष्काळी पट्टा. मात्र,  इथला शेतकरी जिद्दी. जवळ असणाऱ्या थोड्याथोडक्या पाण्यावर शेती जगवत होता. साठ सत्तर वर्षापूर्वी साखर कारखान्यांच पेव फुटलेलं नव्हत. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला हक्काचं मार्केट नव्हत. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता. अशातच गावातला कोणीतरी खटपट्या तरुण रोजगार शोधायला मुंबईला गेला. अन् मुंबईला गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की, इथं आपल्या उसाला भरपूर मागणी आहे. या उसाचे छोटे – छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले. नंतर कोणाच्या तरी लक्षात आलं असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथ हे रस काढून विकावं.  एकाने सुरूवातीलाच रसवंती गृह टाकले. नंतर हळूहळू हे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले.पुढे बोपगावचा उसाचा रस प्रचंड प्रसिद्ध झाला. त्यामुळे बोपगावातील ‘नवनाथ किंवा कानिफनाथ’ रसवंतीगृहाप्रमाणे उत्तम रस आमच्याकडे मिळतो हे दाखवण्यासाठी अनेकांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव ‘नवनाथ किंवा कानिफनाथ’ ठेवले. पुढे ही प्रथाच असल्यासारखे झाले आणि अनेकांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव ‘नवनाथ किंवा कानिफनाथ’ ठेवले. त्यामुळे आपल्याला सर्वाधिक रसवंतीगृहाचे नाव ‘नवनाथ किंवा कानिफनाथ’ असल्याचे दिसते. पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं जायचं. पुढे लोखंडी मशीन आले. बैल गेले. मात्र,  या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी विसरू दिली नाही. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्यावर छुमछुम आवाज करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!