Just another WordPress site

Pincode : पिन कोड का आणि कसा अस्तित्वात आला? पिन कोडच्या निर्मितीमागे नेमकं कोणाचं सुपीक डोकं होतं?

India Post Office म्हटलं की, एकदम वेगळंच वातावरण मनात तयार होतं. आठवणींच्या हिंदोळ्यावरून व्यक्ती भूतकाळात रममाण होते. जुन्या काळी पत्र, तार याच माध्यमातून आप्तेष्टांची चौकशी, ख्याली-खुशाली समजत असे. या पत्रांवर असलेला पिन कोड तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. पाहिला असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेल. मात्र, कधी विचार केलाय, ही पिनकोड कसा आणि का अस्तित्वात आला? पिनकोडच्या निर्मितीमागे नेमकं कुणाचं सुपीक डोकं होतं? ही आयडियाची कल्पना आहे तरी कुणाची?  याच विषयी जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. भारतीय पोस्ट ऑफिसचा इतिहास सुमारे १५० वर्षे जुना

२. श्रीराम भिकाजी वेलणकर हे आहेत पिन कोडचे जनक 

३. १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली

४. आपण राहतो त्या विभागाचा पिन कोड हा ६ अंकी असतो

भारतीय पोस्ट ऑफिसचा इतिहास सुमारे १५० वर्षे जुना आहे. संपूर्ण जगात संवादाचे मोठे नेटवर्क म्हणून पोस्ट ऑफिसकडे पाहिलं जातं. वेगवेगळ्या भाषा, अपुरे पत्ते, दुर्बोध अक्षर, गावांच्या नावांतील साधर्म्य यांसारखे अडथळे पार करून योग्य ठिकाणी पत्र पोहोचवण्याचे अशक्यप्राय काम पोस्ट खातं कशा पद्धतीने करत असेल? तर हे काम सोपे केलं पोस्टल इंडेक्स नंबर म्हणजेच, पिनकोड प्रणालीनं. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पाठवलेले पत्र, वस्तू नेमक्या जागी पोहोचण्यामागे पिनकोडची महत्त्वाची भूमिका असते. आजच्या या अत्याधुनिक जगतात तंत्रज्ञान कितीही पुढं गेलं, ऑनलाइन खरेदी-विक्री होऊ लागली, जी-मेल, व्हॉट्सअॅप आले, तरी पत्ता लिहिताना पिनकोड अनिवार्य असतोच. १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिनकोड पद्धत अंमलात आणली गेली. त्या पूर्वी जनरल पोस्ट ऑफिसमध्ये पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी केली जात होती. मात्र, यात बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. कर्मचाऱ्याना गावांची नावं कळायची नाही, कधी कोणाचे अक्षर समजून घेण्यास समस्या निर्माण होत असे. त्यामुळं वाढत्या पत्रसेवेचा भार सांभाळणं हे दिवसेंदिवस मोठं काम होऊ लागलं होतं. त्यातच निरनिराळ्या भाषा, अपुरे लिहिलेले पत्ते अशा इतर अडचणीही होत्या. याच पार्श्वभूमीवर विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी पिनकोड पद्धत सुरू करण्यात आली.  भारतातील पिनकोड सिस्टिमचा जनक कोकणातील ‘राजापूर’ मधील शाळेत शिकलेला एक हुशार माणूस असेल याची तुम्हाला कल्पनाही नसेल. पण हो हे खरंय. पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी या समस्येवर उपाय म्हणून  १९७२ साली पिन कोड पद्धत अंमलात आणली. त्यामुळं श्रीराम भिकाजी वेलणकर यांना पिनकोडचे जनक मानलं जातं. ते संस्कृत आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते. या पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झालीत.. या  पिनकोडची रचना मोठी विशेष आहे. या पीनकोडमधील पहिला अंक विभाग, तर दुसरा अंक उपविभाग आणि तिसरा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो. शेवटचे तीन अंक पोस्ट ऑफिस सूचित करतात.  दरम्यान, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्रलेखन, पत्र पाठवणे कमी झालं असलं तरीही पिनकोडचे महत्त्व आजही कायम आहे. कोणतीही वस्तू ऑर्डर करायची असल्यास किंवा अगदी आपल्याला ऑनलाइन फूड ऑर्डर करायचे असेल तर पिनकोड खूप महत्वाचा घटक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!