Just another WordPress site

दराअभावी साठवलेला कांदा सडला, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात, उत्पादन खर्चही निघणं अवघड

मुंबई : परतीच्या पावसाने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. अगदी ढगफुटीसारखे पाऊस झाल्याने तीन ते चार वेळा लागवड केलेला लाल कांदा खराब झाला. तर दुसरीकडे चांगल्या दराच्या अपेक्षेने चाळीमध्ये साठवलेला उन्हाळ कांदाही खराब होत चालल्याने उत्पादक बळीराजा पुरता हवालदिल झाला. गेल्या काही महिन्यांपासून चाळीत साठविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. कारण साठवलेल्या कांद्याला कोंब फुटू लागल्यामुळे आणि कांदा सडू लागल्यामुळं कांदा फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

 

महत्वाच्या बाबी

१. चाळीतील कांद्याला कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल
२. शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदत करावी
३. साठवलेला कांदा सडलेला पाहून कांदा उत्पादक हताश
४. लागवड खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांचा वांदा

 

उन्हाळी हंगामातील कांद्याची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठवणूक केली होती. कांदा काढणी नंतर उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. एकरी उत्पादनात सुमारे ५० टक्केपर्यंत घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीला दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांदा साठवला. मात्र यंदा पावसाने सरासरी ओलांडल्याने पावसामुळे कांद्याची चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक सड झाली. उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल, कर्ज फेडून दोन पैसे काही उरतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. कांद्याला भाव येतील आणि आपण साठविलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढू या अपेक्षेन दिवसामागे दिवस गेले. मात्र बाजारभाव वाढण्याऐवजी कमीच होत गेले. त्यामुळे चाळीतील कांद्याला कोंब फुटलेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला.

यंदा मुसळधार पाऊस पडला, दमट वातावरण अशा वातावरणातील बदलामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांदा मोठ्या प्रमाणात सडून नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा लागवड केली होती. त्यामध्ये शेती मशागत खते, औषधे, मजुरी असा चांगलाच खर्च केला. नंतर बाजारभाव चांगला नसल्याने साधारण मे महिन्यात सर्व कांदा बराखीमध्ये टाकला होता. मात्र, उत्पादन खर्च वसूल होईल इतका देखील सध्या कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे एकीकडे पावसामुळे सड होऊन कांदा संपुष्टात येत आहे. तर दुसरीकडे कांद्याला बाजारभावच नसल्याने तो साठवून ठेवल्याने नुकसान वाढत चालले आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेनुसार खरीप हंगामापासून टप्प्याटप्प्याने कांदा विकला; मात्र त्यांना अपेक्षित कांद्याचा बाजारभाव मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे. आता शिल्लक राहिलेला कांदा दोन पैसे देऊन जाईल, अशी अपेक्षा असताना डोळ्यासमोरच कांदा काळपट पडून त्याची टरफले निघून जात आहेत. तर काही कांदाचाळीमधून अक्षरशः काळे पाणी वाहू लागल्याचे विदारक चित्र दिसून येते.

आता बाजारात मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. आता शेतकरी खराब झालेला कांदा बाजूला काढून चांगला कांदा पुन्हा गोण्यात भरून ठेवतोय. मात्र, कांद्याचे खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि कांद्याच्या वजनात देखील घट होत असल्याने या लागवड खर्चही निघतो की नाही या चिंतेत कांदा उत्पादक शेतकरी सापडला. साठवण केलेला कांद्यापैकी निम्मे कांदा खराब झाला असून अजून किती दिवस कांदा साठवून ठेवावा हा देखील प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय.

दरम्यान, कांद्याला सध्या बाजारात चांगला भाव नसल्याने उत्पन्नाचे गणित कसे जुळवावे हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे नुकसान जर असेच चालू राहिले तर शेतकऱ्यांनी पुन्हा कसे उभे राहायचे असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जातोय. त्यामुळं शासनाने काही हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!