Just another WordPress site

MVA : विधान परिषद निवडणुकीत भाजपची सरशी, ठाकरे सरकार अल्पमतात येत चाललं का?

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला. या निवडणुकीत भाजपने राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी १० जास्त मतं फोडून महाविकास आघाडीला जबर धक्का दिला. भाजप आणि त्यांच्या गोटातील लहान पक्षांचे कागदावरील एकूण संख्याबळ हे ११३ एवढं आहे. मात्र, विधान परिषद निवडणुकीत भाजपने १३३ मतं मिळवल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला.सत्तास्थापनेसाठीचा जादुई आकडा हा १४३ इतका आहे. आणि भाजप या आकड्याच्या जवळ पोहोचतोय. त्यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आलंय का? जाणून घेऊ.


महत्वाच्या बाबी 

१. फडणवीसांचा पुन्हा महाविकास आघाडीला चेकमेट

२. राज्यसभेपाठोपाठ भाजपचा विधान परिषदेत विजय

३. भाजपने १३३ मतं मिळवल्याने ‘मविआ’ला मोठा धक्का

४. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता


राज्यसभा निवडणुकीत भाजपचे पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजयी झाले. तर, विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड, प्रविण दरेकर, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय विजयी झाले. भाजपने संख्याबळ नसताना पाचवे उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांना निवडणूक मैदानात उतरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चार उमेदवारांच्या मतांची जुळवाजुळव केल्यानंतर लाड यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू करून लाड यांना निवडून आणलं. या निवडणुकीत लाड यांना १७ मते मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीची २१ मते फुटली असून आघाडीच्या अपक्षांची मते आपल्याकडे वळवतानाच आघाडीतील पक्षांच्या आमदारांची मतेही आपल्याकडे खेचून आणण्यात फडणवीसांना यश आलं.  २१ मते फुटणं ही आघाडीसाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जातंय. आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची मतं फुटणं हे आघाडी सरकार अडचणीत आल्याची चिन्ह असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला अडीच वर्ष पूर्ण होत असतांना राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद या दोन निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले.  महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्यांच्याकडे १६९ आमदारांचं पाठबळ होतं. नंतर राज्यसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतरही सरकारकडे १५० आमदारांचं पाठबळ असल्याचं दिसून आलं. मात्र, २०१९ ला महाविकास आघाडी जितकी मजबूत होती तितकी आता राहिली नसल्याचं दिसतं, असं राजकीय जाणकार सांगतात. शिवाय,  महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यावी लागत असल्याचं दबक्या आवाजात बोललं जायचं. मात्र, आता विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा झालेला पराभव देखील राज्य सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं म्हणजे, फडणवीसांच्या नेतृत्त्वात सलग दोन निवडणुका जिंकल्यानं भाजप प्रोत्साहित झाला.  भाजपचा परफॉरमन्स खूप चांगला दिसला. भाजपची ही वाढलेली ताकद पाहून महाविकास आघाडीच्या आमदारांचं मनोबल खचण्याची शक्यता आहे. यामुळे सरकार अस्थिर सुद्धा होऊ शकतं, असं जाणकार सांगतात.  शिवाय, भाजप येणाऱ्या काळात आणखी आक्रमक होऊ शकतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भाजप अविश्वास ठराव देखील आणू शकतो. भाजपने अविश्वास दर्शक ठराव आणल्यास त्यांना अधिकचे १० आमदार आवश्यक आहेत. त्यासाठी आघाडीती एखादा गट फुटला तर त्याचा धोका महाविकास आघाडीला निश्चितपणे आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी फडणवीस आता काय खेळी खेळतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!