Just another WordPress site

Mamata Benerji : मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्यास तृणमूलचा नकार, ममता बॅनर्जी भाजपच्या जवळ येताहेत का?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा एकत्र उमेदवार असावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या ममता बॅनर्जींचे सूर सध्या बदलल्याचं चित्र आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांपासून दूर राहण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळं भाजप विरोधी गटाला चांगलाच धक्का बसला असून विरोधी पक्षांमधील फाटाफूट पुन्हा चव्हाट्यावर आली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या मनात नेमके आहे तरी काय? त्यांनी हा निर्णय का घेतला? या चर्चांना देशाच्या राजकारणात उधान आलंय.



महत्वाच्या बाबी 

१. मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्यास तृणमूलचा नकार

२. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ममता विरोधकांपासून दूर

३. या निर्णयाने भाजप विरोधी गटाला चांगलाच धक्का बसला

४. भाजप विरोधी पक्षांमधील फाटाफूट पुन्हा एकदा चव्हाट्यावर

राष्ट्रपती निवडणुकीत यशवंत सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवणाऱ्या ममता बॅनर्जींनी उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळं एकच खळबळ उडाली. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी  ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणेच उपराष्ट्रपती निवडणुकीतही संयुक्त उमेदवार देण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला. त्यानुसार, विरोधी पक्षांकडून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली. तर एनडीएकडून पंश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, अल्वा यांना पाठिंबा देण्यास नकार दर्शवला. अल्वा यांचं नाव निश्‍चित करताना  ममता बॅनर्जी यांचं मत जाणून घेतलं नसल्याने हा निर्णय घेतला असल्याचे तृणमुलनं स्पष्ट केलं. दरम्यान, सोनिया गांधी यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी ममता यांना दोनदा फोन केल्याची माहिती आहे. विरोधक ज्याही नावाची घोषणा करतील, त्यांना तृणमूल काँग्रेस पाठिंबा देईल, असं त्यावेळी ममतांनी सांगितल्याची माहिती आहे. मात्र गुरुवारी त्यांनी अचानक भूमिका बदलत, या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या. एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड यांना पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे तृणमूलकडून जोर देऊन स्पष्ट करण्यात आलं. मात्र विरोधकांनी ममता यांच्या या निर्णयाचा संबंध दार्जिलिंगमध्ये झालेल्या भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीशी जोडला. दार्जिलिंगमध्ये उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आणि प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा आणि ममता बॅनर्जी यांच्यात एक बैठक पार पडली होती. याच बैठकीत ममतांनी या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहतील असा निर्णय झाल्याची शक्यता राजकीय जाणकार सांगतात… त्यांच्या  या पवित्र्याने एनडीएच्या उमेदवाराचा विजय अधिक सुकर झाल्याचे मानण्यात बोलल्या जातं. राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. यानंतर सर्व विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांचे नाव सर्वसहमतीने संमत करण्यात आलं होतं. तेव्हा या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली जावी, असा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी ठेवला होता. मात्र,  आता राष्ट्रपती निवडणुकीत घेतलेला पुढाकार आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत ममता यांनी घेतलेली माघार या निर्णयांमुळे पुन्हा एकदा विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचे समोर आलं.  ममता यांनी घेतलेल्या  या निर्णयामुळं त्या भाजपच्या जवळ जातं असल्याचं दिसतं. कारण, भाजने ज्या पध्दतीनं केंद्रीय यंत्रणांचा वापर करून ठाकरे सरकारमधील आमदारांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. आणि राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आणलं. अशाच प्रकारे पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय यंत्रणाचा वापर करून बॅनर्जी सरकारला धक्का देण्याची तयारी भाजपची असल्याचं बोलल्या जातं. त्याचाच भाग म्हणून आता पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या कारवाया सुरू झाल्या. भाजपचे ऑपरेशन लोटस पश्चिम बंगालमध्ये होण्याची भीती असल्यानं ममता बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये  विरोधकांची थोडीफार एकजूट दिसली होती, त्यामुळे २०२४ लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र मैदानात उतरू शकतात का? याची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिलं जात होतं, मात्र, आता याला मोठा धक्का बसला. धनकड आणि  बॅनर्जी यांच्यातील वादही जगजाहीर आहेत, असं असतानाही ममता यांनी मार्गारेट अल्वा यांच्या पाठिंब्याला नकार दर्शवला. त्यामुळं त्या भाजपशी जुळवून घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान, ममता यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं आता विरोधक हे  मार्गारेट अल्वा  यांना निवडणून आणण्यासाठी काय खेळी खेळतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!