Just another WordPress site

महाजनांचा गौप्यस्फोट! खडसे म्हणाले, ‘बसून विषय मिटवून टाकू’; नेमका खडसेंना कोणता विषय मिटवायचा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्यासमवेत दिल्लीत जाऊन भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, आता राज्यातील भाजपचे मंत्री आणि एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांनी एक वेगळाच दावा केला.
भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल दोन मोठे गौप्यस्फोट केले. नाथाभाऊ हे अमित शहांना भेटायला गेले होते. त्यावेळी ते शहांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर बसले होते. तीन तास बसले होते. मला शहांच्या कार्यालयातून फोन आला होता. मी माहिती घेतली. त्यावेळी शहांची भेट घेण्यासाठी आम्ही तीन तास त्यांच्या कार्यालयाबाहेर बसून असल्याचं रक्षा खडसे यांनीच मला सांगितलं, असं महाजन म्हणाले. एवढा वेळ बसूनही शहा यांनी खडसेंना भेट दिली नाही. हे स्वत: रक्षा खडसे यांनीच मला सांगितलं, असा दावा महाजन यांनी केला होता. तर ‘आपण बसून विषय मिटवून टाकू’, असे खडसे मला आणि फडणवीसांना म्हणाले, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. नाशिकमध्ये नुकताच महानुभव पंथाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात एकनाथ खडसे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. नाशिकमध्ये खडसे यांनी फडणवीसांना आणि मला एक विषय मिटवून टाकू असं सांगितलं होतं. पण गर्दीत तो विषय कोणता? हे मात्र आम्हाला कळलं नाही, असं महाजन यांनी आज मीडियाशी बोलताना सांगितलं. खडसे यांच्या मनामध्ये काय चाललंय? त्यांना कोणतं प्रकरण मिटवायचं आहे? हे सगळं कार्यक्रमात गर्दी असल्यामुळे मी त्यांना विचारलं नाही, असेही गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र महाजनांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली असून असं काय प्रकरण आहे जे एकनाथ खडसेंना महाजन-फडणवीस या दोघांसोबत बसवून मिटवायचं आहे, याची चर्चा आता सुरु झाली. महाजन यांनी त्रोटक माहिती दिल्याने खडसेंबाबतचा संभ्रम कायम आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं. गिरीश महाजनांच्या या गौप्यस्फोटावर अद्याप एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यामुळे खडसे यांच्या मनामध्ये चाललंय काय? पुन्हा भाजपमध्ये जाण्यास खडसे उत्सुक आहेत का?, अशी चर्चा पुन्हा राज्याच्या राजकारणात रंगली.
भाजपमध्ये असतांना खडसेंनी कठोर परिश्रम, संघटन बांधणीची कला या आपल्या राजकीय कर्तृत्वाच्या जोरावार साध्या कार्यकर्त्यापासून ते राज्याचे विरोधीपक्षनेत्यांपर्यंत मजल मारली. मात्र, पुढं २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढं ईडीकडून त्यांना सातत्याने विविध चौकशीसाठी नोटीस येत राहिल्या. पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात खडसे यांच्यावर आरोप आहेत. या कथित गैरव्यवहारप्रकरणी खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी यांच्यावर ‘ईडी’च्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, खडसेंनी पक्षत्याग करीत हातावर ‘घड्याळ’ बांधल्यानंतर त्यांचं विधानपरिषदेवर आमदार करून पुनर्वसन झाले.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीचं खडसे यांना ‘ईडी’ची नोटीस आली. खरं तर गेल्या तीन- चार महिन्यांपासून खडसे यांच्यावरील कारवाईचे हे प्रकरण कुठेतरी शांत झाल्याचं दिसत होतं. मात्र, विधान परिषद निवड होताच खडसेंच्या दारी ही नोटीस आली. दरम्यान, खडसेंनी सर्व काही मिटवण्यासाठी महाजन आणि फडणवीसांना जी विनंती केली होती, ते हेच भोसरी भूखंड प्रकरण तर नाही, अशी चर्चा धरु लागली. त्यामुळंच खडसे अस्वस्थ आहेत का? असा सवाल केला जातोय.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!