Just another WordPress site

How is rainfall predicted? | २ जूनपर्यंत मोसमी पाऊस तळकोकणात दाखल, हवामान खात्याचा अंदाज; मोसमी पावसाचे भाकित कसे वर्तवतात?

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, यावेळी मान्सूनचे वारे पाच ते सहा दिवस आधीच अंदमानाच्या समुद्रात दाखल झाले. येत्या २ जूनपर्यंत मोसमी पाऊस तळकोकणात येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. याच निमित्ताने  मोसमी पावसाचे अंदाज कसे व्यक्त करतात? नेहमीच अचूक ठरतात का? याच विषयी जाणून घेऊ.


हायलाईट्स

१. मोसमी पाऊस पाच दिवस आधीच अंदमानमध्ये दाखल

२. मोसमी पावसाच्या संदर्भात भारतीय हवामान खात्याची माहिती

३. २ जूनपर्यंत मोसमी पाऊस तळकोकणात येईल – IMD

४. मुंबईमध्ये येत्या ६ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता


कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत मोसमी पावसाचे मोठे योगदान आहे. देशात वर्षभरात पडणाऱ्या एकूण पावसामध्ये मोसमी पावसाचा वाटा ७० टक्क्यांच्या आसपास  असून या मोसमी पावसावर कृषी व्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकरी मान्सूनच्या पावसाची वाट पाहात असतात. यंदा १ जूनला केरळमध्ये, तर मुंबईमध्ये ६ जून रोजी मान्सून दाखल होईल, असं भाकित हवामान विभागानं वर्तवलंय.

मान्सूनचा पाऊस म्हणजे काय?

भारतीय उपखंडात जो पाऊस पडतो त्याला मान्सून म्हणतात. एखाद्या विशिष्ट मोसमात भारताच्या नैऋत्य दिशेकडून येऊन भारताला धडकणाऱ्या आणि सोबत भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस असं म्हटलं जातं. भारतात हा पाऊस साधारणपणे जून ते सप्टेंबर या महिन्यात पडतो.


१३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

येत्या २ जूनपर्यंत मोसमी पाऊस तळकोकणात येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. याशिवाय, हवामान विभागाच्या मते महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत १७ ते २१  मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.  याबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.


मोसमी पावसाचे आगमन कसे कळते?

पावसाचा हंगाम सुरू होण्यासाठी अद्याप काही दिवसांचा  कालावधी शिल्लक असताना देशात अमुक तारखेला मान्सून धडकेल, आणि सरासरी इतका-तितका पाऊस पडेल, असे भाकीत कशावरून केले जाते, हा प्रश्न कुणालाही पडू शकतो.  त्यात वाऱ्यांची दिशा, अवकाश, समुद्राची स्थिती आदींचा सातत्याने अभ्यास केला जातो. त्यासाठी हवामान केंद्रांसह उपग्रह, रडार यंत्रणा यांचा आधार घेतला जातो. हंगामाच्या कालावधीत ही स्थिती कशी राहील, याचा अंदाज प्रारूपांच्या आधारे मांडला जातो आणि त्यावरून त्या-त्या काळातील हवामानाची आणि पावसाची भाकिते केली जातात.  मोसमी पावसाचे हे आगमन भौगोलिक स्थितीमुळे कळते. वायव्य भारतातील कमीत कमी तापमानाची नोंद आणि भारतीय प्रायद्वीप पठाराच्या दक्षिण भागातील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण यावरून मोसमी पावसाचा अंदाज बांधला जातो. दक्षिण चीनच्या समुद्रावरील बहिर्गामी दीर्घतरंग विकिरणाचा तसेच आग्नेय हिंद महासागरात खालील भागात क्षोभमंडलातील हवेचा दाब, पूर्व भागातील भूमध्यरेखीय हिंद महासागराच्या भागातील क्षोभमंडलातील हवेचा दाब आणि नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील बहिर्गामी दीर्घतरंग विकिरण या सर्व भौगोलिक परिस्थिती आणि नोंदींचा अभ्यास करून मोसमी पावसाच्या अंदाज व्यक्त केले जातात.

यंदा किती पावसाची शक्यता?

जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. यंदा पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. यंदा गुजरातमध्ये नेहमीपेक्षा कमी पाऊस पडेल, तर पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. इतकेच नाही, तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की, यंदाचा पाऊस शेतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. हवामान अंदाज देणाऱ्या खासगी स्कायमेट संस्थेने मोसमी पावसाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार यंदा ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला.

पावसाची सरासरी कशी काढतात?

भारताच्या प्रत्येक राज्यात, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि शहरातील हंगामातील पाऊस गेल्या कित्येक वर्षांपासून हवामान विभागाच्या पर्जन्य मापक केंद्रांच्या माध्यमातून मोजला जातो. हंगामातील कोणत्या महिन्यात किती पाऊस होत असतो किंवा हंगामातील प्रत्येक दिवशी कुठे किती पाऊस होतो, याचा सखोल अभ्यास करून सरासरी काढण्यात येते.  त्यानुसार हंगामाच्या कालावधीत संपूर्ण देशात सरासरी किती मिलिमीटर पाऊस होतो, याचे गणित मांडण्यात येतं.

पाऊस मोजण्याच्या श्रेणी कोणत्या?

हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या  पाच श्रेणी ठरविल्या आहेत. त्यानुसार ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत ९० ते ९६ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत ९६ ते १०४ टक्के म्हणजे सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०४ ते ११० टक्के आणि ११० टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.

हवामान विषयक अंदाज अचूक असतात का?

हवामान विभागाकडून प्रसृत केल्या जाणाऱ्या अंदाजांना काही वर्षांपूर्वी फारसे महत्त्व दिले जात नसे. पावसाच्या अंदाजावर कृषी क्षेत्र पूर्णपणे अवलंबून आहे. अंदाज चुकल्यामुळे सर्वाधिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असे. भारतीय हवामान विभाग आणि शास्त्रज्ञांना अमेरिका तसेच अन्य प्रगत देशांकडून मोसमी पावसाबाबतचे संदेश किंवा संकेत दिले जात असत. त्यावरून भारतीय संशोधक त्या गणितीय मॉडेल आणि हवामान बदलांचा अभ्यास करुन मोसमी पावसाचे अंदाज बांधत होते. सन २०१५ मध्ये मोसमी पावसाने चकवा दिला होता आणि भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. हवामान विषयक अंदाज पूर्णपणे अचूक येण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारतीय हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन केले. संशोधनातून अचूक अंदाज बांधता येणे शक्य झाले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज बऱ्यापैकी अचूक ठरले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!