Just another WordPress site

Ginger Farming : आले लागवड कशी आणि केव्हा करावी? आले लागवडीसाठी जमीन कशी लागते? जाणून घ्या.

हंगाम खरीप असो की रब्बी, पीक काढून घरात आणलं की त्याला मार्केटमध्ये नेमका किती भाव मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना कायम सतावत असतो. बऱ्याचदा शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्याची अनेक कारणं आहेत. मागणी नसणं हे त्यातलंच एक कारण. मात्र, आल्याला वर्षभर बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळं त्याला चांगली किंमत देखील मिळते. याच निमित्ताने आले लागवड कशी करावी? त्यासाठी लागवड करतांना काय काळजी घ्यावी? याच विषयी जाणून घेऊ. 



आल्यातील विशिष्ट चव आणि स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आल्याला वर्षभर चांगली मागणी असतो. विविध मसाल्यांमध्ये, भाज्यांमध्ये आल्याचा वापर होतो. गृहिणींकडूनही आल्याला नेहमीच मागणी असतो. त्यामुळेच आल्याच्या शेतीतून शेतकऱ्यांना हमखास आणि शाश्वत उत्पन्न मिळू शकते.


आले लागवडीसाठी जमीन कशी असावी?

आले हे कंदवर्गीय पीक असल्याने जमीन भुसभुसीत असणं गरजेचं आहे, त्यासाठी उत्तम निचरा होणारी, मध्यम प्रतीची कसदार जमीन निवडावी. या पिकाचे कंद जमिनीमध्ये एक फूट खोलीपर्यंत वाढतात, त्यामुळे कमीत कमी एक फूट खोली असलेली जमीन निवडावी.  चुनखडीयुक्त जमिनीमध्ये शक्यतो आल्याची लागवड करू नये. कारण पिकावर पिवळसर छटा राहते. दुसरं म्हणजे, आल्याच्या लागवडीसाठी कंदवर्गीय पिके म्हणजे,  हळद, बटाटा, रताळे ही पिके घेतलेली जमीन निवडू नये, त्यामुळे कंदकूजचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो.


लागवड कधी करावी?

साधारणत: आल्याची लागवड एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत केली जाते. त्यानंतर अधिक उशीर झाल्यास उत्पादनात घट होते.  आल्याच्या उगवणीसाठी ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.


बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी

आल्याची लागवड करण्यासाठी या पिकाचे कंद वापरले जातात. त्यासाठी आल्याच्या वेगवेगळ्या जातींचा वापर केला जातो. हवामानाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते.  सातारा परिसरातील माहीम, औरंगाबाद परिसरातील औरंगाबादी, कालिकत, कोचीन, मारन या जातींची लागवड केली जाते. दरम्यान, बियाणे निवडतांना कंदकूज रोगास बळी न पडलेल्या शेतातून ९ ते १० महिने पूर्ण झालेले कंद आल्याचे बियाणे म्हणून वापरावे.  आल्याच्या बियाण्यास १ ते दिड महिन्याची सुप्तावस्था असते. निवडलेले बियाणे सावलीच्या ठिकाणी साठवावे.  बियाण्याची आडी लावलेल्या ठिकाणी हवा खेळती राहील असे पाहावे. तसेच, बियाण्याच्या ढिगावर दिवसातून एकवेळ गोणपाट पूर्णपणे भिजवून पिळून टाकावे.  लागवडीच्या अगोदर एक ते दोन दिवस बियाण्याचे २५ ते ४५ ग्रॅम वजनाचे आणि लांबी २.५ ते ५ सेंमी असलेले तुकडे करावेत. बियाण्यावरती एक ते दोन डोळे येतील हे पाहावे.


आंतरपीक म्हणूनही करता येते लागवड

आल्याची लागवड प्रामुख्याने नैसर्गिक पावसावर अवलंबून असते. याची शेती स्वतंत्र किंवा आंतरपीक म्हणून करता येईल. पपई, तसेच इतर झाडांसह तुम्ही आल्याची शेती आंतरपीक म्हणून करू शकता.  आंतरपीक म्हणून आल्याची शेती करताना बियाण्याचं प्रमाण कमी लागतं. आल्याची लागवड करताना दोन वाफ्यातील अंतर ३० ते ४० सें.मी आणि दोन रोपांमधील अंतर २० ते २५ सें.मी ठेवलं जावं. तसंच कंद चार ते पाच सेंटीमीटर जमिनीच्या खाली घालावे, आणि ते माती किंवा शेणखताने झाकून टाकावे.


लागवड करताना घ्यावयाची काळजी 

● लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूला असावा,  त्यामुळे निपजणारा कोंब मजबूत असतो आणि त्याची वाढ चांगली होते.

● कंद ४ ते ५ सेंमी खोल लावावेत.

●  लागवडीच्या वेळी कंद पूर्ण झाकले जातील, याची दक्षता घ्यावी. 

● एकरी ३० ते ३५ हजार रोपांची संख्या किंवा कंदांची संख्या ठेवावी.


लागवडीनंतर काय काळजी घ्यावी?

आल्यामध्ये शेणखताचा वापर जास्त केला जातो, त्यामुळे तणांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लागवडीनंतर लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ॲट्राझीन ४ ते ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. लव्हाळा किंवा हराळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव असल्यास, लागवडीनंतर ९ – १० व्या दिवशी ग्लायफोसेट हे तणनाशक ४ ते ५ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.  साधारण पंधरा दिवसांपासून आल्याची उगवण व्हायला सुरवात होते, त्यानंतर मात्र कोणतेही तणनाशक वापरू नये.


हेक्टरी किती उत्पन्न होतं?

आल्याचं पीक साधारण ८ ते ९ महिन्यांत तयार होतं. या पिकाचं सरासरी उत्पादन हेक्टरी १५० ते २०० क्विंटल असतं. १ एकरात १२० क्विंटल आल्याचं उत्पादन होतं. एका हेक्टरमध्ये या पिकाची लागवड करण्यासाठी सुमारे ७ ते ८ लाख रुपये खर्च येतो. बाजारात आल्याचा भाव ८० रुपये किलोपर्यंत आहे. हा भाव सरासरी ५० ते ६० रुपये गृहीत धरला, तरी एक हेक्टरमधून तुम्हाला २५ लाख रुपये मिळतील. सर्व खर्च वजा केल्यानंतरही तुम्हाला १५ लाख रुपयांचा फायदा होईल.



Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!