Just another WordPress site

तुम्हाला ठाऊक आहे का, पृथ्वीवर एकूण मुंग्यांची संख्या आहे तरी किती? संशोधकांनी शोधली आकडेवारी

पृथ्वीवरील मानवांची लोकसंख्या किती? असा प्रश्न जर कोणी विचारला? तर त्याचं उत्तर देता येतं. कारण जगातील प्रत्येक देशात जनगणना केली जाते. पण जर तुम्हाला विचारलं पृथ्वीवर मुंग्याची संख्या किती? तर तुम्हाला याचं उत्तर सांगता येणार नाही. आकाशातील तारे कुणी मोजू शकत नाही, तसेच पृथ्वीवरील काही प्रजातींचे जीवही आपण मोजू शकणार नाही, असेच आपल्याला वाटू शकेल. मात्र, पृथ्वीवर किती मुंग्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आता एका अहवालात देण्यात आलंय. तर जाणून घेऊ, पृथ्वीवर मुंग्याची संख्या आहे तरी किती?
सृष्टीची रचना म्हणजे, एक किमया असल्याचं अनेकदा आपण ऐकतो. जीवन, मृत्यू यांच्यात निसर्गही समतोल राखतो. प्रत्येक जीव जन्माला येतो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. जीवन, मृत्यूमध्ये राखलेल्या समतोलामुळे सर्व सजीवांची लोकसंख्याही संतुलित राहते. पृथ्वीवर अनेक प्राणी, किटक आहेत, ज्यांची संख्या मानवापेक्षा हजारो पटींनी अधिक आहे. यामध्ये मुंग्यांचाही समावेश आहे. मुंग्या आपल्या आजूबाजूला कायमच आढळतात. मग ते स्वयंपाक घर असो, वा बेडरूम. कुठेही मुंग्या असतात. आता शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं असून त्यातून त्यांनी मुंग्यांच्या लोकसंख्येबाबत धक्कादायक दावा केला. मुंग्यांची संख्या पृथ्वीवरील मानवी लोकसंख्येपेक्षा एक-दोन नव्हे तर तब्बल २५ लाख पट जास्त आहे.
पृथ्वीवर किती मुंग्या आहेत हे जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र योग्य पद्धत आणि पुराव्याअभावी नेमका आकडा कळू शकला नाही. आधीच्या अंदाजाप्रमाणे जगात मुंग्यांची संख्या ही एक क्वाड्रेलियन आणि १० क्वाड्रेलियनच्या दरम्यान असल्याचं जैवशास्त्रज्ञांनी सांगितलं होतं. मात्र, आता नव्या संशोधनामध्ये जगभरातील माहितीचा अभ्यास करुन, मुंग्यांसंदर्भातील ४६५ वेगवेगळ्या अभ्यास अहवालांचे आणि उपलब्ध कागदपत्रांचं वाचन करुन शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार जगामध्ये २० क्वाड्रेलियन मुंग्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, २० क्वॉड्रिलियन म्हणजे किती? तर २० क्वॉड्रिलियन म्हणजे, २० हजार ट्रिलियनपेक्षा जास्त मुंग्या. हे अंकस्वरुपात पाहायचं झालं तर, २० सोबत १५ शून्य (२०,०००,०००,०००,०००,०००) म्हणजे ही संख्या इतकी जास्त आहे की, ती वाचणं किंवा मोजणं जवळजवळ अशक्यच. ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि हाँगकाँगच्या संशोधकांच्या एका चमूने ही मुंग्यांची संख्या शोधून काढली. प्रोसेडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
या संशोधनात असे आढळून आलं की मानवाचे एकूण बायोमास ६ कोटी टन आहे. मुंग्यांचे एकूण बायोमास १.२ कोटी टन आहे. म्हणजेच, मुंग्यांचे वजन मानवाच्या वजनाच्या एक पंचमांश किंवा सुमारे २०% इतके आहे. या अहवालात असंही सांगण्यात आलं की, १४ते १५ हजार कोटी वर्ष आधीपासून मुंग्या पृथ्वी वर आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!