Just another WordPress site

Danish Ansari : योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लिम चेहरा असलेले दानिश अन्सारी आहेत तरी कोण?

उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा योगी सरकार विराजमान झाले.  भाजपच्या दणदणीत विजयानंतर योगी आदित्यनाथ यांनी काल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार्‍या दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या चेहऱ्यांपैकी सर्वात आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजे दानिश आझाद अन्सारी.  विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकाही मुस्लिम व्यक्तीला तिकीट दिलं नाही. मात्र, दानिश आझाद अन्सारी यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.  दरम्यान दानिश आझाद अन्सारी आहेत तरी कोण, त्यांना मंत्रीपद देऊन योगी सरकार काय संदेश देऊ पाहते, याविषयी जाणून घेऊ.


हायलाईट्स

१. योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लिम चेहरा

२. दानिश आझाद अन्सारी यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी

३. दानिश यांनी केला मुसलमान तरुणांमध्ये संघाचा प्रचार

४. दानिश यांची अ. भा. वि. परिषदेतून राजकारणाला सुरुवात

योगी सरकारमध्ये ५२ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. दानिश अन्सारी हे योगी सरकारमधील एकमेव मुस्लिम मंत्री आहेत. ते ३२ वर्षांचे असून, मुळचे बलियातील अपायल गावातील रहिवासी आहेत. दानिश यांच्या वडिलांचे नाव समीउल्लाह अन्सारी आहे. दानिश त्यांच्या आई-वडिलांचे एकमेव पुत्र आहेत. त्यांचे आई-वडील अत्यंत धार्मिक आहेत. दानिश यांनी सुरुवातीचं शिक्षण आपल्या अपायल गावातल्या प्राथमिक शाळेतूनच घेतलं.  पुढं बारावीच्या शिक्षणासाठी ते बलियाला गेले. बलियालामधून त्यांनी बारावीपर्यंतच शिक्षण घेतल्यावर ते लखनौ विद्यापीठात बी. कॉमसाठी गेले. लखनौ विद्यापीठातून त्यांनी बी. कॉम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मास्टर क्वालिटी मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतलं. लखनौ विद्यापीठात शिकत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणाला सुरुवात केली. ते २०११ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे बरोबर काम करू लागले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी विविध पदे त्यांनी भूषविलीत. दानिश यांनी मुसलमान तरुणांमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रसार करणं सुरू केलं. त्यामुळेच त्यांना ओळख मिळत गेली. त्यांना पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे महामंत्रीही बनवण्यात आलं. ते अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. तसेच ते योगींच्या जवळचे मानले जाते.  दरम्यान, यंदा दानिश योगी सरकारच्या मंत्रीमंडळातील मुस्लिम चेहरा आहेत. योगी सरकारच्या आधीच्या सरकारमध्येही एकच मंत्री होते, त्यांचं नाव मोहसिन रजा. भाजपचा मुस्लिम चेहरा म्हणून ओळख असलेल्या मोहसीन रझा यांना यावेळी वगळून त्यांच्या जागी भाजपने दानिश आझाद अन्सारी यांना संधी दिली. यूपीमधील मुस्लिम मतदारांची संख्या पाहता भाजपला नेहमीच मुस्लिम चेहऱ्याची गरज असते. पक्षाने गेल्या वेळी मोहसीन रझा यांना मंत्री केले होते. मात्र, महत्त्वाच्या मुद्यांवर त्यांनी फारशी भूमिका घेतली नाही. दानिश यांच्या जमेची बाजू म्हणजे ते अन्सारी समुदायातून येतात. यूपीमधील अन्सारी समाज हा मुळात विणकर आहे.  पूर्वांचल हा अन्सारी समाजाचा बालेकिल्ला समजला जातो. या समाजाला फारसे राजकीय प्रतिनिधीत्व नाही. त्या समाजाला प्रतिनिधीत्व देऊन नवीन राजकीय गणित तयार करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.  दरम्यान, दानिश यांना मंत्रीपद देण्यापूर्वी  २०१७ साली त्यांनी योगींनी उर्दू भाषा समितीचे सदस्य बनवले होते. २०२१ साली त्यांना अल्पसंख्यांक मोर्चाचे महामंत्री म्हणून जबाबदारी दिली होती.  दरम्यान, दानिश यांच्या कामाची बक्षीसी म्हणून त्यांना योगी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले. महत्वाचं म्हणजे,  त्यांनी यावेळेस निवडणूक लढवलेली नाही. शिवाय, ते विधानसभेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!