Just another WordPress site

CM shinde Vs Thackrey ‘धनुष्यबाणा’साठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न, सेनेत फुट पाडण्याचा शिंदेंचा मास्टर प्लॅन तरी काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचत आमदार-खासदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केली असली तरी पक्ष मात्र सोडलेला नाही. मी शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचं शिंदे यांच्याकडून सांगण्यात येतंय. अशातच आता धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याकडे घेण्यासाठी शिंदे यांच्याकडून जोरदार पावले टाकली जाताहेत. त्यांनी बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं.  यामध्ये त्यांनी त्यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी केली होती.

महत्वाच्या बाबी 

१. शिवसेना म्हणजे आमचा गट असल्याचा शिंदेंकडून दावा

२. धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडे घेण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न 

३. आयोगाला पत्र, ‘शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळावी’

४ शिंदे गटाने १८८ सदस्य आपल्या बाजूला वळवल्यास सेनेत फुट! 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही मूळ शिवसेना पक्ष म्हणजे आमचा गट असल्याचा दावा करीत आहेत. शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हा पक्ष आपल्या ताब्यात घेण्यासाठी  शिंदे गट पूर्ण ताकदीने प्रयत्न करतोय. कारण, शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणावर फुटले असले तरी शिवसेना ताब्यात घेणं, शिंदेंसाठी तितकं सोपे नाही. त्यामुळे आता शिंदे यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनंतर शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेतील सदस्य कसे फोडता येतील, यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. त्यासाठी शिंदे गट निकराने प्रयत्न करतोय. खरंतर पक्षांतरबंदी कायद्यानुसार केवळ आमदार, खासदार फुटले म्हणजे पक्षात फूट पडली असं होत नाही. त्यासाठी संघटनेतही फूट असणं आवश्यक असते.  आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे.  शिवसेनेच्या महत्वाच्या मानल्या गेलेल्या प्रतिनिधी सभेत २८२ सदस्यसंख्या आहे. त्याच्या दोन तृतीयांश म्हणजे १८८  सदस्यांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा मिळाला तर शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रचलेल्या मनसुब्यांप्रमाणे संपूर्ण शिवसेना पक्षावर त्यांना ताबा मिळवता येऊ शकतो. त्यासाठी शिवसेनेतील राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रमुख नेत्यांनाच आपल्याकडे वळवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. आणि  तसं घडल्यास संपूर्ण शिवसेना पक्षच ठाकरे कुटुंबीयांच्या निसटण्याची दाट शक्यता आहे. हा धोका आता शिवसेनेच्या लक्षात आला.  त्यामुळेच सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून संघटना बळकट करण्यावर भर दिला जातोय. सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य हे पक्षनेते असतात. शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे आहेत.  राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण १४ सदस्यांपैकी ९ सदस्यांना निवडून देण्याचे अधिकार आहेत. उर्वरित पाच जागांवरील सदस्यांची निवड पक्षप्रमुख करतात. दर पाच वर्षांनी हे सदस्य निवडले जातात. २०१८ साली हे सदस्य निवडण्यात आले होते. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य हे पक्षनेते असतात. सध्याच्या घडीला राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांची हकालपट्टी केली होती. तर सुधीर जोशी यांच्या निधनामुळे एक जागा अगोदरच रिक्त झाली होती. त्यामुळे आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य उरले.  शिवसेनेच्या घटनेनुसार संघटनेत कोणतेही बदल करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांमध्ये कोणत्याही मुद्द्यावर मतभेद असतील तर शिवसेना पक्षप्रमुखांचा कौल हा निर्णायक असतो. त्यामुळं शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील नेत्यांनाच आपल्याकडे वळवण्यात आणि प्रतिनिधी सभेतील सदस्य फोडण्यात शिंदे गट यशस्वी होतोय का, हेच पाहणं महत्वाचं आहे….

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!