Just another WordPress site

Banana : केळीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात, घसरत्या केळी दराला सुणासुदीचा आधार मिळेल का?

निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम यंदा खानदेशातील केळी उत्पादनावर झालेला आहे. त्यामुळे केळीची आवकही कमी झाली.  असे असले तरी बिहार, गुजरात, मध्यप्रदेशातून आवक वाढली. वाढत्या आवकमुळे आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे केळीच्या दरात घसरणच सुरु आहे. महिन्याभराच केळीचे भाव हे ३ हजार रुपये क्विंटलवरुन थेट १ हजार ५०० रुपये क्विंटलवर येऊन ठेपले. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय.


महत्वाच्या बाबी 

१. केळीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात

२. वाढती आवक अन् व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे घसरण

३. केळीचे दर ३ हजारांवरून १ हजार ५०० रुपयांवर आले 

४. प्रशासनाने योग्य दर मिळवून द्यावे, शेतकऱ्यांची मागणी 


केळी हे असे फळ आहे जे तिन्ही हंगामात घेतले जाते. बारामाही केळीला मागणी असते. मात्र, यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम केळी बागावर आणि पर्यायाने केळीच्या दरावरही झाला. गेल्या जून महिन्यातील मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.  राज्याच्या अनेक भागात  वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.  त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला. या निसर्गाच्या लहरीपणामुळे खानदेशातील जळगावसह इतर जिल्ह्यातील केळीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातील केळीचे दर थेट २ हजार रुपये क्विंटलवर गेले होते. शिवाय आवक घटल्याने हेच दर महिन्याभरात थेट ३ हजार रुपये क्विंटलवर पोहचले होते. त्यामुळे केळी उत्पादकांना अच्छे दिन आले होते. कमी उत्पादन झाले तरी अधिकच्या दरामुळे उत्पादनावर केलेला खर्च भरुन निघत होता.मात्र, गेल्या काही दिवसांपासून बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरातहून केळीची आवक ही वाढली. त्यामुळे केळीचे दर हे १ हजार ५०० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. यामध्ये आवक वाढल्याचे कारण असले तरी दुसरीकडे व्यापाऱ्यांनी केलेल्या खेळीचाही परिणाम होऊ लागला.  व्यापाऱ्यांनी ठरवूनच केळीचे सौदे कमी रकमेस करण्यास सुरवात केली.  त्याचा देखील परिणाम दरावर होऊ लागला आहे. ऐन सनासुदीच्या दिवसात केळीची मागणी वाढलेली असताना अनाकलनीय रीतीने केळीचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाले. खानदेशातील केळीचा उठाव हा कमी आहे. कारण खानदेशातून केळी ही उत्तरप्रदेशाच पोहचवण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत खर्च आणि वेळही अधिक लागतो. आता सणोत्सावातच केळीच्या दराला आधार मिळेल या आशेवर उत्पादक आहेत.  सध्या क्विंटलमागे दिड हजार रूपये एवढ्या कमी दरात केळी विकावी लागत आहेत. मातीमोल किंमतीत केळी विकावी लागत असल्यानं  यातून लागलेला खर्चही भरुन निघत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान,  आता लक्ष्मी, गणेशोत्सव, पितृपक्ष आणि नवत्रोत्सव यामुळे केळीच्या दरात सुधारणा होणार का हे पहावे लागणार आहे. दरम्यान, केळी उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रशासनाने मध्यस्थीची भूमिका ठेवून केळीला योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतेय.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!