Just another WordPress site

Army Traning : भारतीय सैन्याचं ट्रेनिंग पाहिलं की, अंगावर काटा येईल, वाचा कसं असतं सीमेवरच्या सैनिकांचं ट्रेनिंग?

सुरक्षा हा शब्द उच्चारला तरी आपल्याला सीमेवर असणारा आपला जवान आठवतो. सार्थ अभिमान बाळगतो आपण आपल्या सैन्याविषयी. आपल्या जवानांविषयी. नव्हे तो असायलाच हवा. कारण सैन्य हे देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक घटक आहे. सैन्यात, नेव्हीत किंवा वायुसेनेत प्रवेश मिळवणं  हे काही खायचं काम नाही. इथं तुमच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी लागते. आणि एकदा प्रवेश मिळाला की मग सुरू होते खडतर प्रशिक्षण. हे प्रशिक्षण नेमकं कसं असतं, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.




हायलाईट्स
१. देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी सैन्य आवश्यक घटक
२. भारतीय सीमेच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी BSF कडे
३. स्पेशल फोर्सेसमधील पॅरा कमांडोजचे प्रशिक्षण खडतर
४. पॅरा एसएफ कमांडोजने आजवर महत्वपूर्ण कामगिरी केली


श्रीनगरमध्ये सध्या सीमा सुरक्षा दलाच्या नवीन जवानांचं ट्रेनिंग सुरु आहे. ज्यात या नवीन जवानांना खडतर परिस्थितीत स्वतःला सिद्ध करावं लागतं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे भारतीय संरक्षण दलातलं असं एक पथक आहे की ज्यात युद्धजन्य परिस्थितीत लढणारे जवान, अत्याधुनिक लढाऊ विमानं आणि अद्ययावत रणगाडे आणि शस्त्रास्त्र पहायला मिळतात. भारतीय सीमेच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी या पथकाकडे असते. ट्रेनिंगदरम्यान अशा अनेक खडतर परिस्थितीतून या जवानांना जावं लागतं.  या ट्रेनिंगमध्ये जवानांना अत्याधुनिक शस्त्रांचा वापर, तसेच  अँटी ड्रोन टेक्नोलॉजीचे धडे दिले जातात. भारतीय सीमेवर अतिरेकी किंवा दुसऱ्या देशातील सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न, स्मगलिंग, लष्करी कारवाई आणि इतर परिस्थितीचा सामना BSF ला करायचा असतो. भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून होणारे हल्ले आणि दोन्ही देशांमधला युद्धाचा इतिहास पाहिला तर BSF च्या जवानांना डोळ्यात तेल घालून सज्ज ठेवावं लागतं. BSF चे जवान भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचं तसेच भारत-बांगलादेशच्या सीमेचं रक्षण करतात. एकवेळ हे प्रशिक्षण पूर्ण करणे तुलनेने सोपं आहे. मात्र, सर्जिकल स्ट्राईक  सारखी अत्यंत महत्वाची आणि जोखमीची जबाबदारी ज्या सैनिकांवर सोपवण्यात येते त्या स्पेशल फोर्सेसमधील पॅरा कमांडोजना जे प्रशिक्षण दिले जाते त्याचे वर्णन अग्निदिव्य ह्या एकाच शब्दात करता येते. भारतीय सैन्यदलाच्या इतर बटालियन्स आणि पॅरा एसएफमध्ये सर्वात मोठा फरक कुठला असेल, तर तो त्यांना देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगचा आहे. हे भारतातील सर्वात कठीण मिलिटरी प्रशिक्षण तर आहेच. शिवाय, हे जगातील सर्वात कठोर आणि खडतर कमांडो प्रशिक्षणांपैकी एक आहे. हे प्रशिक्षण नुसते बघितले तरी अंगावर काटा येतो आणि आपोआपच ह्या जवानांबद्दलचा आदर द्विगुणित होतो. पॅरा एसएफ सैनिकांना ९० दिवसांच्या एक वेगळ्या प्रशिक्षणातून जावे लागते. या प्रशिक्षणात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांची कसोटी लागते. त्यातून सुद्धा ते तावून सुलाखून बाहेर पडतात आणि देशाच्या रक्षणासाठी सज्ज होतात. या प्रशिक्षणात त्यांना शस्त्रात्रांच्या प्रशिक्षणासह कम्युनिकेशन, वैद्यकीय आणि स्वयंपाकाचेही प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना अंडरकव्हर एजन्ट म्हणून काम करता यावे ह्यासाठी त्यांना विविध भाषा सुद्धा शिकवण्यात येतात. या कमांडोजच्या प्रशिक्षणात असलेला सगळ्यात कठीण भाग म्हणजे ३६ तासांची स्ट्रेस फेज. ह्या फेजमध्ये त्यांना सलग ३६ तास न झोपता राहायचे असते. ह्या दरम्यान त्यांना जेवण आणि पाणी सुद्धा दिले जात नाही. ट्रेनिंगमध्ये २०-२० किलोच्या दोन जेरी कॅन उचलून न्याव्या लागतात. ६०-८५ किलो वजन असलेले ट्रकचे टायर उचलून न्यावे लागतात. ह्या सगळ्यांसह त्यांच्याजवळ त्यांची ३० किलो वजनाची बॅग कायमच असते आणि त्यांची शस्त्रे सुद्धा असतात. ह्याखेरीज त्यांना ही सगळी वजनं उचलून न्यावी लागतात. ह्या फेजच्या दुसऱ्या टप्प्यात सैनिकांचे हात पाय बांधलेले असतात आणि त्यांना १२ फूट खोल थंडगार बर्फाच्या पाण्यात उडी मारण्यास सांगितले जाते.  तसेच सिवेज लाईन्समधून सरपटत जाण्याचे ट्रेनिंग सुद्धा देण्यात येते. ट्रेनिंगच्या शेवटी या सैनिकांना चक्क काचा खाण्यास सांगितले जाते. ही काचा खाण्याची परीक्षा सैनिकांचा निडरपणा तपासण्यासाठी घेण्यात येते. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धापासून ते उरी सर्जिकल स्ट्राईकपर्यंत अनेक महत्वाच्या वेळेला या पॅरा एसएफ कमांडोजने महत्वपूर्ण कामगिरी बजावली.. देशसेवेचं व्रत घेऊन रणांगणात उतरलेल्या या जवानांमुळे कोट्यवधी भारतीय जनता रात्री निवांत झोपू शकते. या सर्व शूर सैनिकांना हात जोडून मानवंदना दिली पाहिजे.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!