Just another WordPress site

Anil Awchat : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली असून सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जातेय.


हायलाईट्स

१. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे निधन

२. राहत्या घरी वयाच्या ७८  व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

३. लेखनासह व्यसनमुक्तीसाठी अवचट यांचं मोठं योगदान 

४. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची मोठी हानी


अनिल अवचट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर आधी पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी पत्रकार नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला.  आठ भावंडात ते सर्वात मोठे असल्याने त्यांनी डॉक्टर व्हावे ही त्यांच्या वडीलांची तीव्र इच्छा होती. गावात राहून हे जमणे कठीण असल्याने वडिलांनी त्यांना पुण्याच्या मॉर्डन हायस्कूलमध्ये, बोर्डिंगमध्ये शिक्षणासाठी पाठवले. १९५९ मध्ये दहावी झाल्यावर फर्ग्युसन कॉलेज मधून ते इंटर आणि पुण्याच्याच बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. झाले. मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतानाच बीजेमधील मित्र डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. जब्बार पटेलांसारख्या मित्रांसोबत सामाजिक जागृती, विकास आणि क्रांती या विषयावर त्यांच्या चर्चा चालायच्या. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली. पुढे या तिन्ही मित्रांनी डॉक्टरीपेक्षा सोडून कला, समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. अवचट यांनी लेखन आणि सामजसेवेला वाहून घेतले होते. त्यांनी महाविद्यालयीन जीवनातही मेडिकल कॉलेज अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. पुढेही  समाजकार्याकडे कल असल्याने त्यांनी सामाजिक चळवळीमध्येच स्वत:ला झोकून दिलं. अनिल अवचट यांच्या लेखनाची शैली अत्यंत वास्तववादी होती. त्यांनी रिपोर्ताज पद्धतीचे लेखन अधिक केले. त्यांच्या या लेखन शैलीमुळे ते अधिक लोकप्रिय ठरले.  सामाजिक क्षेत्रातील अनुभवाशी निगडीत अशा प्रकारचे लेखन साधना साप्ताहिकातील वेध या सदरातून त्यांनी केले. साधना आणि पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे संपादनही त्यांनी केले. युक्रांदला अर्पण केलेले पूर्णिया हे बिहारच्या समाजदर्शनाविषयीचे त्यांचे पहिले पुस्तक १९५९ मध्ये प्रकाशित झाले.  तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. आतापर्यंत त्यांची बावीसहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अनिल अवचट हे केवळ एक साहित्यिक नसून त्यांच्या अनेक ओळखी आहेत, त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांमधून दिसून येतं.  अवचट यांचा पिंड कार्यकर्त्यांचा होता. म्हणूनच त्यांनी दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत  मुक्तांगण संस्थेची उभारणी केली होती. तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती.  मुक्तांगण या संस्थेनं अनेक आयुष्य उध्वस्त होण्यापासून रोखली. अवचट यांनी समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण करत अनेक कार्य केली. ते स्वत: पत्रकार होते. त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अवचट हे केवळ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते.  ओरिगामीतून विविध आकार साकारणे हा त्यांचा आवडता छंद होता. अनिल अवचट यांनी साहित्यिक विश्वात आपलं मोठं योगदान दिलंय. महाराष्ट्र राज्य आणि देशपातळीवर त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार,  अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आलंय. याशिवाय,  त्यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार, राज्य शासनाचा राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गेल्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव केला.  अवचट यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक चळवळीचं नेतृत्व हरपलं उपेक्षित- वंचित- दुर्लक्षित घटकावर शोककळा पसरली.  त्यांच्या जाण्याने सामाजिक जाणीव असलेला, समाजकार्यात अग्रेसर असलेला संवेदनशील व्यक्ती आणि बालसाहित्यात मोठं योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त केली जाते. 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!