Just another WordPress site

Phospurus Bomb : युक्रेनने रशियावर केला फॉस्फरस बॉम्बच्या हल्ल्याचा आरोप, पाहा, फॉस्फरस बॉम्ब किती हानिकारक आहे?

रशिया आणि युक्रेन युद्धाला आता जवळपास महिना पूर्ण होतोय. हे युध्द आता धोकादायक टप्प्यावर पोहोचले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या इशाऱ्यावर लष्कराकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, गुरूवारी रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहरावर फॉस्फरस बॉम्बच्या सहाय्यानं हल्ला केल्याचा आरोप युक्रेननं केलाय. दरम्यान, फॉस्फरस बॉम्ब  काय आहे? हा बॉम्ब किती घातक आहे? या बॉम्बच्या वापराबाबत कायदा काय सांगतो? याच विषयी जाणून घेऊ.



हायलाईट्स

१. रशिया-युक्रेन युध्द धोकादायक टप्प्यावर पोहोचले

२. युक्रेनने केला फॉस्फरस बॉम्बच्या हल्ल्याचा आरोप

३. रशियानं ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व परिसीमा

४. युक्रेनियन लष्कराकडून रशियाविरूध्द निकराचा लढा


काय आहे फॉस्फरस बॉम्ब?

फॉस्फरस हा रसायनाचा प्रकार आहे. त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र, निवासी भागात या बॉम्बचा वापर करण्यास बंदी आहे. फॉस्फरसला रंग नसतो, पण प्रकाशात राहिल्यावर या रसायनाचा रंग कधीकधी  फिकट पिवळा दिसतो. हा एक मेणासारखा मऊ तंतुमय  पदार्थ आहे, ज्याला लसणासारखा वास येतो. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर तो जळतो. या  फॉस्फरसचा वापर युद्धादरम्यान स्फोटकं आणि धुराचे आवरण तयार करण्यासाठी केला जातो.


फॉस्फरस बॉम्ब किती घातक?

पिवळा फॉस्फरस अत्यंत विषारी असून त्याचा धूरही तितकाच घातक ठरतो. तर पांढरा फॉस्फरसने पेट घेतल्यानंतर त्याचे तापमान जवळपास ८०० डिग्री सेल्सियसपेक्षाही जास्त जाऊ शकते. मोकळ्या जागेवर फॉस्फरस बॉम्ब टाकल्यास तो शेकडो किलोमीटरच्या त्रिज्येत पसरू शकतो. आयसीआरसीच्या मते, हा फॉस्फरस जोपर्यंत संपत नाही किंवा तेथून ऑक्सिजन संपत नाही तोपर्यंत तो जळत राहतो. त्याच्या संपर्कात आल्यावर जळजळ होते आणि ही जळजळ इतकी तीव्र असते की ती मृत्यूपर्यंत पोहोचते. पांढरा फॉस्फरस मांसाला चिकटतो, ज्यामुळे त्याची जळजळ अधिक तीव्र होते. इतकंच नाही तर त्वचेच्या संपर्कात आल्यावर ते फॉस्फोरिक पेंटॉक्साइड सारखी रसायनं तयार करू शकतात. हे रसायन त्वचेच्या पाण्याशी विक्रिया करून फॉस्फोरिक ऍसिड तयार करते,  जे की अधिक धोकादायक आहे. यामुळे अंतर्गत ऊतींचे आणि अवयवांचे नुकसान करते, ज्याला बरे होण्यास वेळ लागतो. परिणामी, मृत्यूही होण्याचा धोका असतो.


कायदा काय म्हणतो?

रासायनिक शस्त्र वापण्याबाबत १९७७ मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे एक अधिवेशन झाले, ज्यामध्ये पांढर्‍या फॉस्फरसच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. मात्र युद्धामध्ये वापरले जाऊ शकते. या परिषदेतील करारानुसार रासायनिक शस्त्रे विकसित करणे, उत्पादित करणे, बाळगणे, त्याचा साठा करणे या सर्वावर बंदी आहे. याचबरोबर करारानुसार सीड्ब्लूसी मधील देशांना कोणत्याही रासायनिक शस्त्रे वापरणाऱ्या देशाचे समर्थन करता येणार नाही.  १९९७ मध्ये रासायनिक शस्त्रांच्या वापराबाबत एक कायदा अंमलात आला. या कायद्यात असे ठरवण्यात आले की, ते निवासी भागात वापरले गेले तर पांढरे फॉस्फरस हे रासायनिक शस्त्र मानले जाईल. रशियानेही या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!