Just another WordPress site

IPL : आयपीएलच्या इतिहासामधील ‘या’ वादग्रस्त घटना तुम्हाला ठाऊक आहेत का?

आयपीएल स्पर्धेचा १५  वा सिझन कालपासून सुरू होतोय. आयपीएलच्या १५व्या हंगामात १० संघ सहभागी होणार आहे. स्पर्धेला सुरूवात होण्याच्या एक दिवस आधी नाराजी नाट्य समोर आलंय. राजस्थान रॉयल्स संघात सर्व काही ठीक नसल्याचे समोर आले. खरंतर एक तप पूर्ण केलेल्या आयपीएल स्पर्धेने तितकेच वादविवादही पाहिले आहेत.  आयपीएल आणि वाद ही गोष्ट चाहत्यांना नवी नाही. प्रत्येक हंगामात काही ना काही तरी वादग्रस्त गोष्टी होत असतात.  या वादांनी अनेकदा खेळ बाजूला पडून सर्व लक्ष त्या वादावर केंद्रित झालं होतं. कोणत्या कारणांमुळे  नेमकी आयपीएल चर्चेत आली, याच विषयी जाणून घेऊ.


हायलाईट्स

१. हरभजन सिंगने लगावली श्रीसंतच्या कानशीलात

२. गॅब्रिएला पासक्यूलोटोने मांडलं आयपीएलचं डर्टी सत्य

३. शाहरुखवर वानखडेवर येण्यास घातली होती बंदी

४. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सवर बंदी

हरभजन सिंगने लगावली श्रीसंतच्या कानशीलात

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनी २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, हे दोघेही २००८ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत प्रचंड चर्चेत आले होते. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात हरभजन सिंगने श्रीसंतला  कानाखाली लावली होती. हरभजन सिंग त्यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळत होता, तर श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग होता. सामना झाल्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देत असताना ही घटना घडली होती. हरभजनने श्रीसंतला थोबाडीत मारणं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं नाही, मात्र मॅच संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीआधी श्रीसंत रडत असल्याचं जगभरातील क्रिकेट चाहत्यांना दिसलं होतं. हरभजन सिंगचे म्हणणे होतं की, श्रीसंतने अशी काही प्रतिक्रीया दिली होती, जे पाहून त्याला राहवले नव्हते. एस श्रीसंतला कानाखाली मारल्यानंतर हरभजन सिंगला संपूर्ण हंगामातून बाहेर करण्यात आले होते.  शिस्तभंगाचा दोषी आढळल्याने त्याचे मानधनही नाकारण्यात आलं. शिवाय, ५ वनडे सामने खेळण्यावर देखील निर्बंध घालण्यात आलं होतं.

गॅब्रिएलानं मांडलं आयपीएलचं डर्टी पिक्चर

२००८ मध्ये इंडियन प्रीमिअर लीगला सुरुवात झाली अन् क्रिकेटचा चेहराच बदलला. ललित मोदी यांच्या संकल्पनेतून आलेल्या या लीगनं अल्पावधीतच जगाचे लक्ष वेधले. पैसा, ग्लॅमर, चीअर लीडर्स असा संपूर्ण मनोरंजनाचा पॅकेज आयपीएलमधून क्रिकेट चाहत्यांना मिळू लागला. मात्र, या झगमगाटामागे एक काळा चेहराही होता अन् मुंबई इंडियन्सची चीअर लीडर्स गॅब्रिएला पासक्यूलोट्टो  हीनं तो समोर आणला. २०११मध्ये गॅब्रिएलानं एक ब्लॉग लिहिला होता.  या बॉगमध्ये आयपीएलच्या पार्ट्यांमध्ये चीअर लीडर्सना कशी वागणूक दिली हे सांगून आयपीएल पार्ट्यांमधील डर्टी सत्य जगासमोर आणलं होतं. गॅब्रिएलाने लिहिलं होतं, आम्ही अक्षरक्ष: चालत्या फिरत्या पॉर्न स्टार, अशी आमची अवस्था झाली होती. हे क्रिकेटपटू अतिशय चारित्र्यहीन आणि खोडसाळ आहेत. असभ्य वर्तन करणाऱ्या क्रिकेटपटूंची नावंही तिने लिहिली होती.” . मात्र त्याचवेळी एमएस धोनी आणि रोहित शर्मा हे अतिशय चांगले वागतात, ते त्यांच्या विश्वात असतात असंही गॅब्रिएलाने लिहिलं होतं. गॅब्रिएलाच्या ब्लॉगमुळे काही खेळाडूंची गोपनीयता धोक्यात आली, असं वृत्तांकन दक्षिण आफ्रिकेतील प्रसारमाध्यमांनी केलं. कारण याप्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथचं नाव समोर आलं होतं. त्या हंगामादरम्यान मुंबई इंडियन्सने गॅब्रिएलाचा करार रद्द केला होता.

शाहरुख खानने सुरक्षा रक्षकांना केली धक्काबुक्की  

‘आयपीएल’मधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक असलेल्या शाहरुख खानवर मे २०१२ मध्ये वानखेडेवर प्रवेशबंदी घालण्यात आली होती. कोलकाता विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतर शाहरुखने वानखेडे स्टेडियमवरील एका सुरक्षारक्षकाशी गैरवर्तन केलं होतं. कोलकाताने मुंबईविरुद्धची मॅच जिंकल्यानंतर शाहरूख खानची मुलं आणि त्यांचे मित्र ग्राऊंडमध्ये जाताना दिसले. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखायचा प्रयत्न केला.  सुरक्षारक्षक नियमांच्या चौकटीत राहून आपली ड्युटी करत असताना शाहरुखने क्षुल्लक कारणावरून त्याला धक्काबुक्की केली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरुखवर स्टेडियममध्ये येण्यास पाच वर्षांची बंदी घातली होती.

ललित मोदी यांची हकालपट्टी

आयपीएलची संकल्पना ज्यांनी मांडली आणि अंमलात आणली त्या ललित मोदींनाच दोन वर्षांत पायउतार व्हावं लागलं. २०१० मध्ये ललित मोदींना तीन कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या. गोपनीयता कराराचा भंग, प्रक्षेपण हक्क वितरणात कथित भ्रष्टाचार आणि लिलावात फेरफार असे हे तीन आरोप होते. बीसीसीआयचे पदाधिकारी आणि आयपीएलचे सर्वेसर्वा ललित मोदी यांचं संस्थान बघता बघता खाली झालं. कोची टस्कर्स केरला संघासंदर्भात गोपनीय माहिती त्यांनी ट्वीट केली होती. या सगळ्याची परिणती म्हणजे त्याच वर्षी आयपीएल कमिशनर पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

चेन्नई-राजस्थानवर बंदीची कारवाई

२०१३ मध्ये भारतीय क्रिकेट विश्वाला हादरवणारी गोष्ट आयपीएलमध्ये घडली होती. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने आयपीएलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांसाठी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना अटक केली. मुंबई पोलिसांनी कथित सट्टेबाजी आणि बुकींबरोबरच्या संबंधांसाठी विंदू दारा सिंग आणि गुरुनाथ मय्यपन यांना अटक केली. मय्यपन हे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष  एन. श्रीनिवासन यांचे जावई होते. हे सगळं प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. तर,  श्रीसंतवर बीसीसीआयने आजीवन बंदीची कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणामुळे आयपीएलची एक स्पर्धा म्हणून तसंच खेळाडूंच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!