Just another WordPress site

Pramod Sawant : दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले प्रमोद सावंत यांची राजकीय पार्श्वभूमी काय?

नुकताच उत्तर प्रदेशातील शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचप्रकारे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजप नेते आणि प्रमोद सावंत हे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थित होते. दरम्यान, गोव्याचे सीएम म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणारे प्रमोद सावंत यांच्या राजकीय प्रवासाविषयी जाणून घेऊ.


हायलाईट्स

१. प्रमोद सावंत यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

२. पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांची उपस्थिती

३. प्रमोद सावंत आयुर्वेदिक डॉक्टर आहेत

४. सरकारी नोकरी सोडून केला राजकारणात प्रवेश

तब्बल तीनवेळा आमदार असलेले प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २० जागा जिंकून भाजप पुन्हा सत्तेवर आला. प्रमोद सावंत यांचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. प्रमोद सावंत हे अत्यंत सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील जिल्हा पंचायतीचे सदस्य होते. जेव्हा ते वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्याचवेळी त्यांनी महाविद्यालयाच्या सरचिटणीस पदाची निवडणूक जिंकून आपले नेतृत्वगुण दाखवून दिले होते. बारावीपर्यंत गोव्यात शिक्षण घेतल्यानंतर सावंत यांनी पुढील शिक्षणासाठी १९९१ मध्ये कोल्हापूरच्या  गंगा आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रवेश घेतला.  सावंत यांचे नेतृत्वगुण ओळखून त्यांच्या महाविद्यालयातील मित्र परिवाराने त्यांना १९९२ मध्ये सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत उभे केले. या निवडणुकीत ते प्रचंड बहुमतांनी जिंकले. यातून खर्‍या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.  त्यांनी कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठातून बीएएमएस ही पदवी मिळवली. पुढं टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ ही पदवी मिळवली. प्रमोद सावंत हे डॉक्टर झाल्यावर गोवा सरकारच्या वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. त्यांनी  डॉक्टर म्हणून काही काळ प्रॅक्टिसही केली.  मात्र,  राजकारणामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. २०१२ साली प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातून निवडून येत गोवा विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ते पुन्हा एकदा विजयी झाले. सावंत यांची प्रतिमा स्वच्छ असून त्यांना राष्ट्रीय स्वंय सेवक संघाची पार्श्वभूमी आहे. RSS केडरमधील असल्यामुळं त्यांना विशेष महत्त्वही आहे. सावंत हे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षही होते. शिवाय, ते नेहरू युवा केंद्राशीही संबंधित होते. माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांच्याकडे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा आली. २०१९साली प्रमोद सावंत यांना पहिल्यांदाचं गोव्याचं मुख्यमंत्री पद मिळालं. त्यापुर्वी ते  पर्रिकर सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्षही राहिलेले आहेत. दरम्यान, आज ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सावंत यांनी प्रशासनाशी सुसंवाद साधत त्यांनी गेल्या अडीच वर्षात गोव्याचा राज्यकारभार समर्थपणे सांभाळला.. तर पक्षीय पातळीवर देखील आपला वरचष्मा कायम ठेवला.  या सगळ्याचा परिपाक म्हणून प्रमोद सावंत यांना आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं.  त्यामुळे गोव्यातील सर्वमान्य नेतृत्व अशी आता त्यांची ओळख झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!