Just another WordPress site

Raj Thackrey : राज ठाकरेंची ब्लू प्रिंट हरवली, जनतेचे प्रश्नांना पाठ दाखवून जातीय ‘राज’कारणात सक्रीय

गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. तर कालच्या भाषणात राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिलं.  जर ३ मे पर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर देशभर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय, शिवाय, कालच्या भाषणात भोंग्यांवरुन टीका करणाऱ्या महाविकास आघाडी नेत्यांवरही राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल करून आपल्या स्टाईलनं समाचार घेतला. मात्र नेमकं खरं तरी कुणाचं समजायचं? 



हायलाईट्स

१. मशिदींवरील भोंगे हटविण्याचा सरकारला इशारा

२. राज ठाकरे यांनी दिला ३ मे पर्यंत अल्टिमेटम

३. देशात समान नागरी कायदा आणा – राज ठाकरे

४. निवडणुकींसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात येतो

राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. आघाडीतील तीनही पक्षांवर तोंडसुख घेतलं. शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला होता. तसेच, या सभेतून त्यांनी मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं होतं.  ठाकरे यांच्या भाषणात महागाई, बेरोजगारी हे लोकांच्या हिताचे विषय असतील, असं सामान्य माणसाला वाटलं. मात्र, त्यांच्या भाषणात होतं ते  हिंदुत्त्व, मशिदीवरचे भोंगे अन् हनुमान चालिसा. राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट दाखवणारे नेते आहेत. मात्र, ब्लू प्रिंटपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मशिदीवरील भोंग्यापर्यंत आला. त्यामुळे त्यांनी आपल्या भूमिका बदलल्या आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्या. कालच्या उत्तरसभेतही त्यांनी गुडीपाडव्याच्या भाषणात जे बोललो, ते बरोबर कसं होतं, हेच ठासून सांगण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतात, पण कधीही छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे नाव ते घेत नाहीत, असे वक्तव्य त्यांनी उत्तरसभेत  केलं. मात्र, राज ठाकरेंनी हे समजून घ्यायला हवं की, फुले, शाहू, आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचेच वारसदार आहेत.  राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडे जाऊन बहुजनांचा इतिहास समजून घेतला तर बरं होईल, असं बहुजन समाजातील अनेकांना वाटतं. शरद पवारांनी नाव घेतलं नसेल, पण शिवाजी महाराजांच्या नावाचा ते राजकारणसाठी वापर करत नाहीत. राज ठाकरे यांच्या या तथ्यहीन भूमिकेतून ते केवळ  छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आपली भाकरी शेकून घेण्यासाठी  वापर करतात, हेच यातून अधोरेखित होतं, असं राजकीय जाणकार सांगतात.  महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट, मराठी माणूस यावरून थेट हिंदुत्व, मशिदीवरील भोंगे उतरवण्यापर्यंत राज येऊन ठेपले आहेत.  मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभून दिसत नाही.  प्रबोधनकार ठाकरेंचा समृध्द वारसा असलेल्या राज ठाकरे यांची ही वैचारीक दिवाळखोरीच म्हणावी लागेल, असं तज्ञ सांगतात. शिवसेनेने  काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचा हिंदूत्वाचा मुद्दा जरा बाजूला पडला. दरम्यान, आता शिवसेनेची भूमिका मनसे घेऊ पाहतेय. राज यांची त्याच दिशेने  वाटचाल सुरू आहे. गुढीपाडव्याचे आणि उत्तरसभेचे भाषणदेखील त्याच सुराचे होते. मुस्लीमांच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, मात्र,  मशिदीवरील भोंगे उतरवावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाही तर ज्या मशिदीवर भोंगे आहेत, त्या मशिदीसमोर स्पिकर लावून हनुमान चालिसा लावा, म्हणून कार्यकर्त्यांना जाहीरपणे आदेश दिले. सरकारला ३ मे पर्यंत भोगें उतरवण्यासाठी अल्टीमेट दिलाय.  याच भाषणात आधी राज्यात जातीपातीवरून भांडणं सुरुयेत असं म्हणणारे  राज ठाकरे दुसर्‍या मिनिटाला मशिदीसमोर स्पीकर लावून हनुमान चालिसा लावा म्हणून कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगतात. हा त्यांच्या बोलण्यातील विरोधाभास आहे. शरद पवार आणि त्यांचा पक्ष जातीयवादी आहे, असा आरोप राज यांनी केला. हे तेच राज आहेत ज्यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. राज यांची भूमिका प्रत्येक निवडणुकीत बदलताना दिसली. आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले,   शरद पवार म्हणतात मी जातीवादाचे राजकारण करतो. मी लोकांना भडकावतो. राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावे, राज ठाकरे भूमिका बदलतो म्हणून ! सोनिया गांधी या परदेशी पंतप्रधान देशाला चालणार नाही, हे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे होते. त्यानंतर हाच धागा पकडून शरद पवार बाहेर पडले. १९९९ ला बाहेर पडले आणि निवडणुकीचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. मी कोणती भूमिका बदलली? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. मात्र, माझे निवडून आलेले खासदार दिल्लीत मोदींचे हात बळकट करतील. मोदींनी जसा गुजरातचा विकास केला तसा देशाचा विकास करावा, असे २०१४ साली राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर २०१९ साली मोदींना पूर्वी पाठिंबा दिला याचा आज पश्चाताप होत आहे. गुजरातचा मला दाखवण्यात आलेला विकास हादेखील खोटा होता, प्रत्येक सभेत व्हिडिओ लावून मी भाजपला उघडे पाडणार आहे असे सांगत २०१९ साली लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी सरकारची चिरफाड करत होते. शरद पवारांना भूमिका बदलणारे नेते अशी टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी अनेकदा आपली भूमिका बदलली याचं काय ? देश हितासाठी भूमिका बदलणं हे गैर नाही. शरद पवार हे उभ्या महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे हित जपणारे नेते आहेत, हे नाकारून चालणार नाही. राज यांनी आजवरची वाटचाल पाहिली तर राजकीय स्वार्थासाठी स्वत:च्या सोईनुसार भूमिका बदलणारे राज ठाकरे हे सामान्य नागरिकांची केवळ दिशाभूल करतात हेच यातून सुचित होतं असं राजकीय जाणकार सांगतात.  भाजपच्या विरोधात बोलणारे राज ठाकरे आज भाजपची भाषा बोलताहेत असं वाटतं. विकास, बेरोजगारी, विज, या मुद्यावर आजवर बोलत आलेले राज ठाकरें यांनी गुडीपाडव्याच्या भाषणात आणि उत्तरसभेत सामान्य नागरिकांची घोर निराशा केली.  आजवरच्या प्रत्येक भाषणात उत्तर भारतीयांवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या राज यांनी गुडीपाडव्याच्या आपल्या भाषणात उत्तर भारतीयांबाबत मवाळ भूमिका तर घेतलीच; शिवाय उत्तर भारतात विकास सुरू झाला असल्याचे ठोस विधानही केले. उत्तर सभेत बोलतांना याचं स्पष्टीकरण देतांना ते म्हणाले, माझ्या कानावर ज्या बातम्या येतात, त्याआधारे मी हे वक्तव्य केलं. राज ठाकरे यांच्याकानावर यूपीच्या विकासाच्या कोणत्या बातम्या जातात कुणास ठाऊक ! मात्र,  कोरोनाच्या काळात नद्यांमधून मृतदेह वाहत होते; लखीमपूर खेरीमध्ये शेतकर्‍यांवर गाडी चढवून मारून टाकले जाते या बातम्या त्यांच्या कानावर जात नाहीत हे विशेष ! ज्या राज्यात लखीमपूर खेरी सारखी घटना घडते,  त्या यूपीत राज यांना विकास दिसतो, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं. अनेकांनी तर कपाळावर हात मारला. राज यांना महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपला पर्याय देण्याची संधी होती. मात्र, ती संधी राज ठाकरे यांनी गमावली. आज देशात केजरीवाल यांचा जो करिष्मा आहे, तसाच एकेकाळी राज यांचा करिष्मा महाराष्टात होता. केजरीवाल यांच्या  ‘आप’ने १० वर्षांत दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. मात्र, मनसेला १६ वर्षांत निवडून आलेले आपले आमदारदेखील टिकवता आलेले नाहीत. राज यांची ब्लू प्रिंटच हरवल्यानेच मनसेची आज राज्यात ही अवस्था असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.  मराठी पाट्या झाल्याच पाहिजेत, मराठीवरील अन्याय कदापि सहन करणार नाही अशी दहा-बारा वर्षांपूर्वी आग्रही भूमिका मांडणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘मदरशांवर धाडी घाला आणि मशिदींवरील भोंगे काढा अशा मागण्या केल्याने मनसेचा उलटा प्रवास सुरू झाला, असं राजकीय जाणकार सांगतात.  शरद पवार जातीचं राजकारण करतात, असे आरोप ठाकरेंनी आपल्या भाषणात केले. मात्र, औरंगाबाद विद्यापीठ नामांतरचा लढा उभा करून त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन शरद पवारांनी क्रांतीकारी निर्णय घेतल्याचं राज ठाकरे विसरले याचं नवलं वाटलं. जातीचं राजकारण कोण करतो, हे शहाण्या मतदारांना सांगायचं गरज नाही. राजकीय स्वार्थासाठी राज ठाकरेंकडून जाती-धर्माच्या नावाखाली  समाजामध्ये दुफळी होईल याचा प्रयत्न केला जातोय, असं अनेकांना वाटायला लागलं. गमंत म्हणजे, उत्तरसभेत समान नागरी कायद्याची मागणी करणारे राज ठाकरे हे आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात मराठी आरक्षणाचं काय झालं? असं विचारलं. यातून राज ठाकरे हेच आपल्या भूमिकेवर ठाम नसून त्यांचा पुरता गोंधळ उडाल्याचं दिसतं. उत्तरसभेत बोलतांना राज ठाकरे म्हणाले, मनसे हा संपणारा पक्ष नाही, संपवणार पक्ष आहे. हा राज ठाकरेंचा अतिआत्मविश्वास आहे. आणि तोच आजवर राज ठाकरेंना मारक ठरला. कारण, राज यांच्या भाषणाला मोठी गर्दी होते. मात्र, मतपेटीत त्याचे रूपांतर होताना दिसून येत नाही, असं राजकीय जाणकार सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!