Just another WordPress site

Shivsena Vs Rana : शिवसेना विरूध्द आणि राणा दांम्पत्य यांच्यातल्या संघर्षाची सुरूवात कधी झाली? नेमकं वादाचं मुळ काय?

अमरावती शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा हटविण्यात आला आणि त्यानंतर  उफाळून आलेला वाद निवळत असतानाच काल आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या हनुमान चालिसा प्रकरणाने राणा दांम्पत्य विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला. याच निमित्ताने राणा दांम्पत्या आणि शिवसेना हा वाद आहे तरी काय? या वादाचं नेमकं मुळ काय? याच विषयी जाणून घेऊया.

खरं तर नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर २०१९ ला लोकसभेत निवडून आल्या. मात्र, आता त्या भाजपसाठी बॅटींग करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाबाबतच्या भूमिकेनंतर राणा दांम्पत्याने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची आग्रही भूमिका मांडल्याने काल राणा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला.


राणा-शिवसेना वादाचं मुळ काय?

नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले. आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांनी पराभव केला. शिवसेनाचा पराभव २०१९ ला झाला असला, तरी शिवसेना विरुद्ध राणा असा राजकीय वाद खरं तर २०१४ लाच सुरू झाला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात नवनीत राणा मैदाना उतरल्या आणि शिवसेना विरूध्द राणा या वादाला सुरूवात झाली. पुढं २०१९ मध्ये राणा आनंदराव अडसुळांविरोधात उभ्या राहिल्या. यावेळी मात्र, राणा यांनी मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली आणि गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेला हरवलं. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता.  नंतर  हा वाद पराकोटीला पोहोचला. आधी अडसूळ त्यांचे टार्गेट होते, आता त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चालवला.

राणा – शिवसेना यांच्यातील वाद कोणते?

● २०१४ च्या निवडणुकीत राणा यांनी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला  होता. अडसूळ यांनी या आरोपांना नकार दिला होता.

● २०१८ मध्ये अडसूळांनी राणा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.

 ● त्यानंतर पुढं रवी राणा यांनी अडसूळांवर खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला.

● २०१९ मध्ये आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप केला.   वाद कोर्टात गेला. नवनीत राणा हायकोर्टात जिंकल्या.

अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिल्याचा  राणा यांचा दावा

अ‍ॅसिड हल्ला करुन जीवे मारून टाकू, असा मजकूर असणारे पत्र १३ फेब्रुवारी २०२१ रोजी आपल्या दिल्लीच्या शासकीय निवासस्थानवर पाठवण्यात आल्याचे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सांगितले होते. नवनीत राणा यांनी हे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर पाठवण्यात आल्याचे म्हटले होते. या प्रकरणासंदर्भात १६ फेब्रुवारी २०२१ रोजी नवनीत राणा यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रारही केली होती. त्यांनी संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ यांच्यावर संशय व्यक्त करत  हे पत्र त्यांनीच पाठवल्याची आम्हाला शंका आहे, असंही या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते.


अरविंद सावंत यांच्या विरोधात तक्रार

खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी धमकावल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना या प्रकरणी पत्र लिहिले होते. संसदेत सचिन वझे प्रकरण उचलून धरल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकी दिली. महाराष्ट्रात तू कशी फिरते ते बघतोच. तुलाही तुरुंगात डांबू, अशी धमकी अरविंद सावंत यांनी दिल्याचं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटंले होते. तर नवनीत राणा यांनी केलेले आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी फेटाळून लावले होते.

जात प्रमाणपत्र रद्द, खासदारकी धोक्यात

२०१९ मध्ये पराभवानंतर अडसूळ यांनी नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोप केला आणि त्यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला रिट याचिकेद्वारे आव्हान दिले. नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘मोची’असल्याचे दाखवून मुंबई उपनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जातीचा दाखला मिळवला आणि मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता समितीने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी ते प्रमाणपत्र वैध ठरवले, असा आरोप अडसूळ यांनी केला होता. नवनीत राणांनी २०१३ साली जात प्रमाणापत्र घेतले होते. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र ८ जून २०२१ रोजी रद्द केले होते. तसेच २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. राणा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, सध्या या प्रकरणात सुनावणी सुरू आहे.

राणा दांम्पत्य भूमिकाहिन?

लोकसभेत खासदारकीची शपथ घेताना ‘जय श्री राम’च्या घोषणेंवर नवनीत राणांनी आक्षेप घेतला होता. लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये विजय प्राप्त झाल्यानंतर १७ जून रोजी लोकसभेत खासदारांचा शपथविधी झाला. नवनीत  राणा यांनी सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर काही खासदार जोर-जोरात जय श्रीरामच्या घोषणा देत होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यासाठी संसद ही योग्य जागा नाही. त्यासाठी मंदिरं आहेत. सगळे देव एकच आहेत यावर माझा विश्वास आहे. मात्र जय श्रीरामचे नारे संसदेत देणं योग्य नाही, असे म्हणत त्यांनी धर्मनिरपेक्ष भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. त्या नवनीत राणा यांनी आता हनुमान चालिसावरून घेतलेली भूमिका पाहता, आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

२०२४ च्या निवडणुकांची पूर्वतयारी…

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना राणांचे आघाडीच्या नेत्यांसोबत जवळचे संबंध होते. मात्र, २०१५ साली राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेले. रवी राणा यांना राजकीय भूमिका नसल्याने  त्यांना कायम सत्तेच्या सोबत राहण्याची सवय आहे. त्यांमुळे त्यांना संधीसाधू राजकारणी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, असं सांगण्यात येतं. आणि त्यांच्या याच संधिसाधू भूमिकेमुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर कायम प्रश्नचिन्ह उभं राहतं.  आता भाजपच्या दिल्लीतील राजकारणात आपल्याला महत्त्व मिळेल का? यासाठी मुख्यमंत्र्यांविरोधात रान उठवण्याचा प्रयत्न राणा यांच्याकडून केला जातोय, असंही राजकीय जाणकार सांगतात. दुसरं म्हणजे, राणा यांना आपली राजकीय ताकद वाढवायची आहे. त्या दृष्टीने २०२४ च्या निवडणुकीत कुठल्याही चिन्हावर लढण्याची वेळ आली, तरी मतदारसंघ हातचा जावू नये, यासाठी ते आतापासूनच प्रयत्न करत असल्याचं बोलल्या जातं. त्यामुळे राणांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचं सांगण्यात येतं.  सद्यस्थितीत राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक आमने-सामने आहेत. राणा दाम्पत्याने मंदिरांवर लावण्यासाठी भोंग्यांचे वाटप करून शिवसेनेला आणखी डिवचले आहे. दरम्यान, सेना विरुद्ध राणा हा संघर्ष आता कोणते वळण घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!