Just another WordPress site

Eknath Shinde : ‘..तर एकनाथ शिंदेंचा आनंद दिघे झाला असता,’ नारायण राणे यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

काल विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि राजकीय घडामोडींनी वेग आला. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील धुसफूस बाहेर येऊ लागली. एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसत असून त्यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं असून नारायण राणे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं.  “शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असं ट्विट त्यांनी केलं. दरम्यान, राणे यांनी असं ट्विट का केलं? या ट्विटचा नेमका अर्थ काय? याच विषयी जाणून घेऊ.



महत्वाच्या बाबी

१. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत धुसफूस 

२. मंत्री एकनाथ शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल

३. “शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास” – राणे

४. राणेंनी शिंदे यांच्या बंडाशी आनंद दिघेंचा संबंध जोडला


विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येऊ लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली असतानांच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीय.  राणे यांनी सूचक ट्वीट करत मोठे वक्तव्य केलं. राणे हे स्वतःही शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे याचंच बंड शिवसेनेतील सर्वात मोठं मानलं जातंय. तसंच स्वतः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राणेंनी शिवसेनेतून आता बाहेर पडत असलेल्या नेत्याचं कौतुक केलंय. “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता…” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं. यावरून आता तर्कवितर्क सुरू झाले. खरंतर आनंद दिघे विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत होते. ते कट्टर शिवसैनिक होते. बाळासाहेबांची मोहिनी त्यांच्यावर होती. बाळासाहेबांच्या सभांना ते जायचे. त्यामुळे ते बाळासाहेबांकडे आकर्षित झाले. शिवसैनिक म्हणून काम करू लागले. त्यांची धडाडी पाहून त्यांना पदं मिळत गेली. ठाण्यासारख्या जिल्ह्यात आनंद दिघे यांनी फुलटाईम शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं.  दिवसेंदिवस आनंद दिघेंचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांच्या नावाला वलय, प्रसिद्धी लाभत होती.  ठाण्यातील शिवसेनेचे ते किंगमेकर होते. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, म्हणून बाळासाहेब अस्वस्थ झाले होते, आणि त्यामुळेच त्या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला, अशी त्यावेळी ठाण्यात चर्चा होती. ठाण्यात बाळासाहेबांपेक्षा दिघेंचं प्रस्थ मोठं व्हायला लागलं होतं, म्हणून त्यांना संपवण्यात आलं, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत वेळोवेळी अनेक चर्चा राजकीय वर्तुळात होत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचे काही मुद्द्यांवर मतभेद होते, असंही सांगितलं जातं. तर या मतभेदांचा आनंद दिघेंच्या मृत्यूशी कुठलाही संबंध नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी वारंवार स्पष्टही केलं आहे. मात्र नारायण राणेंनी आता पुन्हा दिघेंचा उल्लेख केल्यामुळे वर्तमान राजकारणासह इतिहासाची पानंदेखील उलटली जाण्याची चिन्हं आहेत.  दिघेंना शेवटच्या काळात भेटणाऱ्या काही नेत्यांपैकी नारायण राणे हे एक नेते असल्याचं सांगितलं जातं. मला त्याबाबत तोंड उघडायला लावू नका, असंही नारायण राणेंनी यापूर्वी अनेकदा सांगितलं.  मात्र आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी आनंद दिघेंचा संबंध नारायण राणेंनी जोडला.  शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात, नाही तर लवकरच तुझाही आनंद दिघे झाला असता, असा उपरोधिक टोला राणे यांनी शिवसेनेला लगावला. यावर आता शिवसेना कोणती भूमिका घेणार हे याकडे राज्याचं लक्ष लागलं. याआधीही ठाकरे आणि राणे यांच्यातील राजकीय वाज चव्हाट्यावर आले आहेत. मात्र आता या वादात राणेंनी उडी घेतल्याने पुढील राजकीय खेळी काय असणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!