Just another WordPress site

महाराष्ट्र दिन विशेष; हा लढा जर मराठी माणसांनी लढवला नसता तर हातची मुंबई गेली असती!

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा अशा शब्दात ज्या राज्याचा गौरव केला जातो त्या महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिन. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. मात्र, या महाराष्ट्र दिनाची नेमकी पार्श्वभूमी काय हे अनेकांना ठावूक नसतं. त्यामुळेच आज आपण महाराष्ट्र राज्याची निर्मीती कशी झाली? हा दिवस कसा साजरा केला जातो? या विषयी आपण जाणून घेणार आहोत.



संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०८ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. तेव्हापासून महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय.



काय आहे महाराष्ट्र दिनाचा इतिहास?

१९६० साला पर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात हे द्विभाषिक राज्य होतं. त्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी जोर धरु लागली. यात अनेकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली. असं म्हणतात की मोरारजी देसाई यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करुन गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी केली होती.


देसाईंच्या या मागणीला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी मोठा संघर्षही झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०८ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.


त्यानंतर मात्र हे आंदोलन अधिक तीव्र झालं. या आंदोलनात आचार्य अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर शेख, केशवराव जेधे, बाळासाहेब ठाकरे या सारख्या अनेक दिग्गजांनी आपआपल्या पद्धतीनं सरकारच्या संयुक्त महाराष्ट्र विरोधी धोरणाचा विरोध केला. 


जनतेच्या जोरदार आंदोलनामुळं आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळं अखेरीस २१ एप्रिल १९६० ला लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राला मान्यता मिळाली. आणि १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करून मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणून घोषीत करण्यात आलं.


संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष नेमका कसा घडला?


त्याचं झालं असं की, २१ नोव्हेंबर १९५६ ची संध्याकाळ होती.  सकाळपासून संयुक्त महाराष्ट्रासाठी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं  होतं.  कारण राज्य पुनर्रचना आयोगानं महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. त्यामुळं मराठी माणसं चिडली होती. मराठी माणसांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनच्या समोरील चौकात जमणार होता. दुपारनंतर, मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची कामाची पहिली वेळ संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चे निघाले. 



या मोर्चांना रोखण्यासाठी फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी करण्यात आली. पण, जमावबंदीला झुगारून मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. या मोर्चाला उधळून लावण्यासाठी  पोलिसी ताकद वापरून लाठीचार्ज करण्यात आला. मात्र लाठीचार्ज अंगावर झेलून सुद्धा एकही मार्चाकरी चौकातून हटला नाही. अखेर पोलिसांना त्यांच्यावर गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी जमावाला दिसताक्षणी गोळ्या असे पोलिसांना आदेश दिले होते मोरारजी देसाई यांच्या या आदेशा परिणामी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी बेच्छुट्ट गोळीबार केला. या गोळीबारात हजारो आंदोलनकर्ते नागरिक जखमी झाले आणि १०८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढं आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळं सरकारला माघार घ्यावी लागली आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.


महाराष्ट्र दिन कसा साजरा केला जातो ?

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेल्या शहीदांमुळंच महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. त्यांचं स्मरण म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र दिनाची ही सुट्टी राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शाळा, कार्यालये आणि कंपन्यांना लागू होते, जे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करतात. महाराष्ट्र दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क इथं परेड होते. त्यात  महाराष्ट्राचे राज्यपाल भाषण देतात. तर अन्यत्र साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात पारंपारिक लावणीसंगीत, लोकगीते आणि लोकप्रिय पोवाडे यांचा समावेश असतो.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांचा बलिदान आणि महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या महामानवांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपणही महाराष्ट्राच्या उन्नतीत आता योगदान देऊया.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!