आमच्याविषयी
प्रिय वाचकहो,
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेला आज निव्वळ बाजारू मूल्य आलयं. निःपक्ष म्हणून घेणाऱ्या माध्यमाचं पक्षपाती धोरणं आहे. २०१४ नंतर जवळपास सगळ्याचं माध्यम संस्था ह्या उद्योगपतींनी विकत घेतल्यानं त्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांचा टक्का माध्यमांमध्ये फार कमी आहे. या प्रस्थापित माध्यमासंस्थांच्या माध्यमातून जी माहिती वाचकांपर्यंत-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते, ती माहिती प्रोसेसिंग करुन पोहोचवली जाते. त्यामुळेच समाजहितोषी, सत्यशोधकी पत्रकारिता मागे पडली. शिवाय आता दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे यासारख्या प्रसार माध्यमानंतर डिजीटल मीडियाचे महत्त्व प्रचंड वाढलेले आहे. ही नव माध्यमें स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी घाईगडबड करून शक्य तितक्या लवकर बातमी वाचकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा चुकीच्या पद्धतीने किंवा अपुरी बातमी वाचकांपर्यत येते. बातमी म्हणून वाचकांपर्यंत पोहोचलेल्या मजकूरला बातमीचे कुठलेही निकष नसतात. त्यात निव्वळ थिल्लरपणा आणि साचलेपणा आल्याचे दिसून येते.
अलीकडेच प्रकाशित झालेल्या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या २०२१ च्या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताला १८० देशांमध्ये १५० वा क्रमांक देण्यात आला असून ही बाब लोकशाहीला मारक असल्याचं बोलल्या जातं. या रिपोर्टमध्ये, भारताला ‘पत्रकारांसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक’ असं संबोधण्यात आलं. या जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात भाजप सत्तेत आल्यानंतर सत्ताधारी राजवटीवर प्रश्न विचारणाऱ्या किंवा टीका करणाऱ्या पत्रकारांवर सातत्याने हल्ले होताहेत. तर अन्य एका रिपोर्टनुसार, भारतात, २०१९ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान, २५६ पत्रकारांवर त्यांच्या कामाच्या ठिकाणी हल्ले झाले. पत्रकारांवर सेन्सॉरशिप लादली गेली. पत्रकारांना आर्थिक अडचणी याव्यात अशा कृती केल्या जाताहेत. खोटे आरोप करून त्यांना गप्प केले जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पत्रकारांमध्ये एक दहशतीचं वातावरण पसरलं. त्यामुळं साहजिक जनसामान्य माणसांचा आवाज माध्यमात उमटत नाही.
पत्रकारितेसाठी भारतात हे असं वातावरण असतां असतांना आम्ही ‘लोकहित वार्ता’ या नावाचे एक न्यूज पोर्टल सुरू केलं. या न्यूज पोर्टलवर राज्यासह देश- विदेशातील चालू घडामोडी, तसेच सामाजिक, आर्थिक, विज्ञान -तंत्रज्ञान, राजकीय, कृषी, उद्योग, शिक्षण, व्यापार, हवामान, सांस्कृतिक, खेळ, दळणवळण, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा विविध क्षेत्रातील बातम्या येथे वाचू शकता. याशिवाय, बातम्यांच्या पलीकडे जाऊन महत्वाच्या घडामोडींचं सखोल विश्लेषणही येथे वाचता येईल. बातमीचा अचूक वेध घेऊन वास्तव आणि सत्य या निकषांवर बातमीदारी करणारं हे न्यूज पोर्टल आहे.
‘लोकहित वार्ता’ कुठल्याही वादाची, पक्षाची पालखी वाहत नसून हे न्यूज पोर्टल केवळ मानववाद, विवेकवादी विचारांशी आणि लोकतांत्रिक मुल्यांशी बांधिल आहे.
– संपादक