२०२२ हे वर्ष संपायला अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. या वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात काही आनंदाच्या घडामोडी घडल्या तर काही वाईट घटनांचाही सामना करावा लागला. हे वर्ष सिनेसृष्टीसाठी अत्यंत वाईट होतं. या १२ महिन्यांत, मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी कलावंतांचं निधन झालंय. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश रडला होता, लोक या धक्क्यातून बाहेरही आले नव्हते की नऊ दिवसांत ‘गोल्डन स्टार’ अर्थात बप्पी दाही सोडून गेले. त्यानंतर राजू श्रीवास्तव, गायक केके यासारख्या प्रेक्षकांच्या अनेक लाडक्या सेलिब्रिटींनी यावर्षी जगाचा निरोप घेतला.
लता मंगेशकर
गानकोकिळा लता मंगेशकर दीर्घकाळ आजारी होत्या. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लता मंगेशकर यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभर शोककळा पसरली होती. लता दीदींच्या गाण्याचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. लता दीदींनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत १६ भाषांमध्ये ६ हजार ५०० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांची सर्वच गाणी सुपरहिट ठरली.
बप्पी लहरी
संगीतकार गायक बप्पी लहरी यांचं १५ फेब्रुवारी रोजी निधन झालं. बप्पी दा यांना मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बप्पी दा यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे त्याचं निधन झालं होतं. त्यांची गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत.
पंडित बिरजू महाराज
पंडित बिरजू महाराज हे भारतातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक, संगीतकार आणि गायक होते. १६ जानेवारीला त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्ली येथील राहत्या घरी हृदयविकारामुळे निधन झाले होते.
रमेश देव
ज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव यांनी २ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनाच्या चार दिवसांपूर्वी त्यांचा ९३ व्या वाढदिवस साजरा केला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. मराठी सिनेसृष्टीत नायक आणि खलनायक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावल्या होत्या.
सिद्धू मुसेवाला
२९ मे २०२२ रोजी मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारमध्ये गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. सिद्धू मुसेवाला हे एक भारतीय संगीतकार, रॅपर, गीतकार आणि अभिनेता होते.
पंडित शिवकुमार शर्मा
प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी १० मे रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं होतं. संतुर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
के.के
ज्यांनी तरुणाईला प्रेम, दोस्ती, रोमान्स गाण्यातून ऐकवला त्या गायक केके यांचे निधन यावर्षी मे २०२२ मध्ये झाले. ३१ मे रोजी कोलकाता याठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोलकत्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. केके यांची बॉलिवूडमधील सर्वोत्तम गायकांमध्ये गणना होते. त्यांनी अनेक भारतीय भाषांमधील गीतांना आपला आवाज दिला.
राजू श्रीवास्तव
गायक केके यांच्या निधनानंतर आणखी एका व्यक्तीच्या मृत्यूचा मोठा झटका प्रेक्षकांना बसलेला. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन प्रेक्षकांसाठी धक्कादायक होते. जिममध्ये वर्कआउट करताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या अनेक दिवस उपचार सुरु होते. मात्र, २१ सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सिद्धार्थ वीर सूर्यवंशी
कुसुम आणि कसौटी जिंदगी सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये अभिनेता म्हणून काम केलेल्या सिद्धार्थ वीर सूर्यवंशी यांना जिम करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी ११ नोव्हेंबरला जगाचा निरोप घेतला.
तबस्सुम
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे १८ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोमधून तबस्सुम यांनी विशेष लोकप्रियता मिळवली होती.
विक्रम गोखले
मराठीसह हिंदी आणि अन्य भाषिक चित्रपटसृष्टीत आपल्या अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबरला निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीट शोककळा पसरली होती.
या सर्वच कलाकारांच्या निधनानं मनोरंजन विश्वाची मोठी हाणी झाली. असे कलाकार परत होणे नाही.