घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोलावं, मोदींना गद्दारांची घराणेशाही प्राणप्रिय; उद्धव ठाकरे कडाडले
Uddhav Thackeray on PM Modi : राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) काल (१२ जानेवारी) नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी घराणेशाहीवर टीका केली. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान झाल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यामुळे तरुणांनी पुढे येऊन सक्रिय राजकारणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केलं. त्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोललं पाहिजे, अशी टीका त्यांनी केली. ते ‘मातोश्री’वर माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीबाबत पंतप्रधान मोदी काहीही बोलले नाहीत. ती घराणेशाही चालते का? गद्दार तुम्हाला लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय… हा सगळा बोगसपणा आहे. घराणेशाहीवर एका घरंदाज माणसानं बोललेलं चांगलं, असा टोला ठाकरेंनी लगावला.
मंदिरात स्वत:ची नव्हे, तर प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवा
पंतप्रधान मोदींनी ‘अटल सेतू’चे उद्घाटन केले. पण, तिथं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो नव्हता. आताही श्री राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही याची चिंता आहे. त्यामुळे अयोध्येच्या मंदिरात स्वत:ची नव्हे, तर प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवा, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना लगावला.
तेव्हा बिळात लपले
अनेक कारसेवकांनी श्री राम मंदिरासाठी खूप योगदान दिले आहे. कारसेवकांमध्ये हिंमत नसती तर श्री राम मंदिर झालं नसतं. जर कारसेवक बाबरी घुमटावर चढले नसते तर आताची लोक श्रीराम मंदिराच्या शिखरावर झेंडे लावू शकले नसते. अनेक लोक झेंडे लावायला येतात. पण, जेव्हा लढायची वेळ येते बिळात जाऊ लपतात, अशी टीकाही ठाकरेंनी केली.
श्रीराम मंदिर ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही
श्रीराम मंदिर बांधले गेले नव्हते तेव्हा मी दोनदा अयोध्येला गेलो होतो. श्रीराम मंदिराचा मुद्दा रखडल्यानंतर शिवसेनेने ‘पहिले मंदिर मग सरकार’ अशी घोषणा केली होती. यापूर्वी शिवजन्मभूमीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर वर्षभरातच न्यायालयाने श्रीराम मंदिर प्रकरणी निर्णय दिला. त्यामुळे जेव्हा मला प्रेरणा येईल, तेव्हा मी अयोध्येला जाणार आहे. श्रीराम मंदिर ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. भगवान श्रीराम सर्वांचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.