महाराष्ट्राच्या खांद्यावर पुन्हा ‘सर्वोच्च’ जबाबदारी, न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी घेतली ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
नवी दिल्ली : देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून डी. वाय. चंद्रचूड यांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड यांनी घेतली. लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. मात्र, गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने त्यांना सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात निरोप देण्यात आला होता.
लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून केवळ ७४ दिवस काम करण्याची संधी मिळाली होती. कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजुने निकाल दिला होता. ललित यांनी ११ ऑक्टोबर रोजी त्यांचे पुढील उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची १७ ऑक्टोबर रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, आता न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली असून त्यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०१४ पर्यंत असेल.
चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून १३ मे २०१६ रोजी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते. दिल्ली विद्यापीठातील कॅम्पस लॉ सेंटरमधून त्यांनी एलएलबी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड स्कूलमधून एलएलएम आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली. चंद्रचूड यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या वडिलांचे २ मोठे निर्णयही बदलेले आहेत. ते आपल्या ठाम निर्णयांसाठी ओळखले जातात. अनेक ऐतिहासिक निकाल दिलेल्या अनेक घटनापीठांचा तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिलेत. अयोध्या, IPC च्या कलम 377 अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे यासारख्या निर्णयांमध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.