टोमॅटो उत्पादकांची परवड सुरुच, टोमॅटोला अवघ्या ४० पैसे किलोचा भाव; नाराज शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले टोमॅटो
पैठण : टोमॅटोला योग्य भाव न मिळाल्याने निराश होऊन आपले टोमॅटो बाजारपेठेमध्येच फेकून त्यावर नाचणाऱ्या शेतकऱ्याची लाल चिखल ही कथा अनेकांनी वाचली असेल. पण पुस्तकातील ही कथा सध्या सत्यात उतरलीये. पैठण तालुक्यातील वडजी येथील कैलास बोंबले या तरुण शेतकऱ्याने भाव मिळत नसल्याने टॉमेटो रस्त्यावर फेकून दिलेत. पैठण तालुक्यात टोमॅटोला भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय.
महत्वाच्या बाबी
१. भाव कोसळल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर फेकले टोमॅटो
२. महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादकांची परवड सुरुच
३. कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला फक्त ४० पैसे किलोचा भाव
४. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न संपण्याचे नाव घेत नाहीयेत. कधी अवकाळी पाऊस पडतो तर कधी शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. टोमॅटो, ढोबळी मिरची आणि फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सर्वात खराब असून किलोला ४० पैसे रुपये इतका भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च किंवा वाहतूक खर्च निघणं अवघड होऊन बसलेय. परिणामी, राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं. रात्र-दिवस कबाडकष्ट करुन पिकवलेल्या टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत साडपला. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर टोमॅटो रस्त्यावर फेकण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. पैठण तालुक्यातील वडजी येथील कैलास राम बोंबले या तरुण शेतकऱ्याने भाव मिळत नसल्यानं टोमॅटो रस्त्यावर फेकला. कैलास यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात सप्टेंबर महिण्यात टोमॅटोची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना एकरी ५० ते ६० हजार रूपये ऐवढा खर्च आला होता. त्यात दिवस-रात्र कष्ट करत टोमॅटो जगवले. जीवतोड मेहनत घेतली. दिवसा वीज नसल्याने टोमॅटोच्या पिकाला रात्रीचं पाणी दिलं. हजारो रुपयांची रासायनिक खते आणि औषधांचा वापर करून टोमॅटो फुलवला. दरम्यान आज टोमॅटोचा पहिला लॉट निघाल्याने कैलास बोंबले यांनी पैठणच्या बाजारात टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी २५ ते २७ किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला १८ रुपयांचा म्हणजे प्रति किलो ४० पैसे भाव मिळत असल्याचे कळताच त्यांनी अर्ध्या रस्त्यातच टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले.
आवक वाढल्याने बाजार गडगडले. त्यामुळे उत्पादन खर्च सोडा, साधा वाहतूक आणि हमालीचा खर्चही निघेनासा झालाय. काहीच हाती येत नसल्यामुळे शेतकऱ्याने चक्क कष्टाने पिकवलेला माल रस्त्याच्या कडेला फेकून दिला. यावर्षी सुरवातीलाच अतिवृष्टी झाल्याने पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यातच जी उरलीसुरली पीक आहेत त्यांचं परतीच्या पावसात होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे खरीप हंगाम जवळपास हातून गेलं. टोमॅटोला भाव मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली. मात्र मागणी कमी आणि आवक जास्त आहे. त्यामुळं सध्या टोमॅटोचा दर्जा चांगला असला तरी टोमॅटोला भाव मिळत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीये. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.