औरंगाबाद : लहान मुलांना इजा होईल किंवा काहीतरी विपरीत घडेल अशा गोष्टी त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न घरातील लोक करत असतात. मात्र, अनेकदा पूर्ण काळजी घेऊनही अतिशय धक्कादायक घटना घडतात. औरंगाबादमधून एक अशीच मन हेलावणारी घटना समोर आली आहे. यात उकळत्या वरणात पडून ५ वर्षीय बालकाचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे.
उकळलेल्या वरणाच्या भांड्यात पडल्याने हा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र, उपचार सुरु असतानाच या ५ वर्षीय चिमुकल्याचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. योगीराज नारायण आकोदे असं या चिमुकल्याचं नाव आहे.
हसनाबाद येथील योगीराज नारायण आकोदे हा ५ वर्षीय बालक आईसोबत खुलताबाद तालुक्यातील सोबलगांव येथे प्रदिप जाटवे यांच्याकडे आला होता. घरात पाहुणे आल्याने जाटवे यांच्याकडून घरात स्वयंपाकाची तयारी सुरु होती. सायंकाळी पाहुण्यांसाठी पाहुणचार सुरु असताना मृत बालक हा वरण बनवलेल्या भांड्याजवळ आला. यावेळी तोल जाऊन तो उकळत्या वरणाच्या भांड्यात पडला.
या घटनेत योगीराज गंभीर जखमी झाला. उपचारासाठी या बालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, यात तो गंभीर जखमी झाला असल्याने घाटी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.