Just another WordPress site

राज ठाकरे- शिंदे-फडणवीस एकाच मंचावर, भविष्यात हे तिन्ही नेते एकत्र येऊन महायुती होईल का?

मनसेकडून मुंबईतील शिवाजी पार्कवर काल दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावेळी राज यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. त्यामुळं ही नव्या राजकीय युतीची नांदी असल्याचीही चर्चा होतेय. दरम्यान,आगामी काळात हे तिन्ही नेते एकत्र येणार का? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. मनसेने शिवाजी पार्कवर केले होते दीपोत्सवाचे आयोजन
२. शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात राज-शिंदे-फडणवीस एकत्र
३. राज-शिंदे-फडणवीस एकत्र आल्यानं राजकीय चर्चांना उधान
४. भविष्यात राज-फडणवीस-शिंदे तिन्ही नेते एकत्र येणार का?

 

राज्यात अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या निमित्ताने नवं राजकीय समीकरण पहायला मिळालं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना बंड पुकारलं आणि आणखी एक नवा राजकीय प्रयोग पहायला मिळाला. दरम्यान आता राज ठाकरेंची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वाढणारी जवळीक पाहता हे तिन्ही नेते एकत्र येणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. त्यातच काल हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र आले. मनसेने काल शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मागील दहा वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर मनसेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, यंदाचा दिपोत्सव विशेष ठरला, तो शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे. महाराष्ट्रात पुन्हा नव्या महायुतीची नांदी पहायला मिळेल अशी चर्चा या निमित्ताने रंगलीये. याआधी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येण्याआधीपासूनच मनसे भाजपच्या युतीची चर्चा होती. यानंतर शिंदे गट आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिंदे-मनसे यांची युती होऊ शकते अशीही चर्चा रंगली होती. मात्र, आता शिंदे-फडणवीस-ठाकरे हे तिन्ही नेते एकत्र आल्याने नव्या युतीची चर्चा रंगली. त्यामुळं आगामी राजकीय गणित जुळवण्यासाठी भाजपा-मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र येणार का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागला.

खरंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हे त्रिदेव एकत्र येऊ शकतात, असं राजकीय जाणकार सांगतात. याला कारण ठरतोय, जुळवून घेण्याचा फॅक्टर. नेत्यांचं कितीही जुळत असलं तरी जमीनावरच्या कार्यकर्त्याचं जुळावं लागतं. कॉंग्रेस-सेना-राष्ट्रवादी यांनी एकत्र येतांना समान कार्यक्रमाची आखणी केली. मात्र, निवडणुकीच्या मैदानावर हिंदूत्वाच्या मुद्दावर लढायीच पाहायला मिळाली. परिणामी, सेना फुटली. मात्र, मनसे-भाजप-शिंदे गट यांच्यात एकत्र येण्यात हा टोकाचा विरोध दिसत नाही. त्यामुळं हिंदूत्वाच्या मुद्दावर राज-शिंदे आणि फडणवीस हे एकत्र येऊ शकतात. भाजप हा प्रखर हिंदूत्ववादी पक्ष आहे. तर गेल्या काही महिन्यांपासून मनसेनं हिंदुत्ववादी भूमिका अधिक प्रखरपणे घेतली असून मनसेनं झेंड्याचा रंगसुद्धा बदललाय. मध्यंतरी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांची ही वाटचाल हिंदुत्वाकडील प्रवासाचे द्योतक आहे. आणि शिंदे गटाची भूमिका देखील हिंदूत्ववादी राहिलीये. या कॉमन फॅक्टरवर हे नेते एकत्र येऊ शकतात, असं राजकीय जाणकार सांगतात. दुसरा मुद्दा आहे तो सोयीच्या आणि बेरजेच्या राजकारणाचा. शिंदे यांना ठाकरे हे आडनाव आणि सोबत येणारी नैतिकता महत्वाची वाटते. त्यामुळंच त्यांनी जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांचं पाठबळ मिळवलं. दरम्यान, राज ठाकरेंचा पाठिंबा मिळाला तर मनसेची फळी शिंदे यांच्या पाठीशी येऊ शकते. परिणामी, उध्दव ठाकरेंना नामोहरन करणं शक्य आहे. त्यामुळं शिंदे आणि राज हे एकमेकांना पुरक आहेत. तर आजवरच्या प्रत्येक भाषणात उत्तर भारतीयांवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या राज अलिकडे उत्तर भारतीयांबाबत मवाळ भूमिका तर घेतलीच. ही एकून राज ठाकरेंची भूमिका भाजपशीही मिळती जुळती आहे. त्यामुळे भाजप- मनसे- शिंदे गट भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं जाणकारांना वाटतं.

दुसरीकडे मुंबई महापालिकेसह पुणे, औरंगाबाद, नागपूर या आणि अशा महत्त्वाच्या महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. मुंबईत शिवसेनेचे आणि उध्दव ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, शिंदे गट फुटल्यानं मुंबई महानगरपालिकेवर उध्दव ठाकरेंना भगवा फडकवताना तारेवरची कसरत करावी लागतेय. त्यामुळं उध्दव यांच्या मुंबईतील वर्चस्वाला हादरा देऊन महापालिका काबीज करण्यासाठी हे तिन्ही नेते एकत्र येऊ शकतात. कारण ठाकरे आणि मुंबई हे समीकरण खूप जुनं आहे. ते सहजासहजी मोडायचं असेल तर आणखी एक ठाकरेच पर्याय म्हणून दिले तर भाजपला त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो. त्यामुळं मुंबई जिंकायची असेल तर राज ठाकरेंना सोबत घेणं भाजपला अपरिहार्य असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. दुसरं म्हणजे, हिंदुत्वासाठी राज्यात ठाकरे बँड गरजेचा आहे, हे भाजपच्या लक्षात आलं. कारण, ग्रामीण राजकारणापेक्षा शहरी राजकारणात मनसेचा आणि राज ठाकरेंचा बोलबाला हा कायम राहिलाय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका पाहता राज ठाकरे यांच्याशी असलेली जवळीक भाजपसाठी निवडणुका आणखी सोप्या करू शकते. शिवाय, मनसेची अवस्था कशी आहे ते अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळं मनसेला नवसंजीवनी मिळायची असेल तर त्यांनाही चांगल्या मित्राची आवश्यकता आहेच. शत्रूचा शत्रू तो मित्र या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरेंचा शत्रू भाजप आणि शिंदे गट झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत आणि शिंदे गटात सोबत जाऊन युती करणं हे कायमच मनसेच्या फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे हे तिन्ही नेते भविष्यात एकत्र आल्यास नवल वाटण्याचं कारण नाही. दरम्यान सध्या दीपोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणारं हे त्रिकूट भविष्यात राज्याच्या राजकारणातही एकत्र दिसणार का? हे पहावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!