Post Office Scheme: गुड न्यूज! अवघ्या २९९ रुपयांत मिळेल १० लाखांचा विमा कवच, काय आहे पोस्ट खात्याची भन्नाट ऑफर?
कोरोना काळानंतर आरोग्य विम्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले. आज अनेकजण विमा काढतांना दिसतात. आपल्या कुटुंबाच्या वैद्यकीय गरजा सुरक्षित करणं याच्यावरच अनेकांचा भर आहे. मात्र, महाग विमा घेतला तर त्याचा हप्ताही महाग असतो. यामुळे अनेक वेळा लोक आरोग्य विमा घेण्यास टाळाटाळही करतात. हे लक्षात घेऊन, आता भारतीय टपाल खातं आणि टाटा एआयजी विमा कंपनीनं विमा क्षेत्रात क्रांतीकारक योजना आणली. याच योजनेविषयी जाणून घेऊ.
महत्वाच्या बाबी
१. कोरोना काळानंतर आरोग्य विम्याचे महत्त्व वाढले
२. भारतीय टपाल खात्याने सुरु केली नवी विमा योजना
३. अवघ्या २९९ रुपयांत मिळेल १० लाखांचा विमा कवच
४. १८ ते ६५ वर्षे वयोगटातील नागरिकांना होणार फायदा
नेमकी काय आहे योजना?
पोस्टाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार केला असून प्रति वर्ष अवघ्या २९९ आणि ३९९ च्या वार्षिक हप्त्यात दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे.. कोणत्याही कारणाने अपघातात विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसांना ५ हजार रुपये आणि या पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. टपाल खात्याच्या या अभिनव योजनेचा देशातील गरिब आणि मध्यम वर्गासाठी मोठा फायदा होणार आहे. वर्षभरात या योजनेचे विमा संरक्षण विमाधारकाला प्राप्त होईल. या योजनेंतर्गत १८ ते ६५ वर्षे वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यास विम्याचा लाभ घेऊ शकतात.
आणखी काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये?
या योजनेत व्यक्तीला वर्षात १० लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल. यामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास १० लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाईल. याशिवाय या विम्यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यास ६० हजार रुपयांपर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरी उपचार घेतल्यास ३० हजार रुपयांपर्यंतचा दावाही दाखल करता येईल. त्याचबरोबर या रुग्णालयाच्या खर्चासाठी १० दिवस तुम्हाला प्रति दिन एक हजार रुपयेदेखील मिळतील. कुटुंबाला वाहतुकीसाठी २५ हजार रुपयांपर्यंतचा खर्चदेखील मिळणार आहे. कोणत्याही कारणाने अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी ५ हजार रुपये आणि या विम्यांतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यतची रक्कम देण्यात येणार आहे.
योजनेचा कालावधी किती?
तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे इंडिया चार पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही नव्याने खाते काढून या योजनेचा लाभधारक होऊ शकता. या योजनेचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी तुमच्या जवळच्या कोणत्याही या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विमा योजनेचे नूतनीकरण करावे लागेल.
२९९ आणि ३९९ च्या योजनेतील फरक काय?
तशा या दोन्ही योजना सारख्याच आहेत. तरी त्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. ३९९ च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना १ लाखांपर्यंतची मदत ही शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अपघातानंतर दवाखान्यात येण्या जाण्यासाठी कुटुंबीयांना १० दिवसांपर्यंत प्रतिदिन १ हजार रुपये मिळतील. तसेच २५ हजार रुपये वाहतूक खर्च आणि मृत्यूनंतर ५ हजार अंत्यसंस्कार खर्च मिळेल, मात्र, हे २९९ च्या योजनेला शिक्षण खर्च, प्रतिदिन १ हजार, वाहतूक खर्च २५ हजार आणि अंत्यसंस्कार खर्च पाच हजार लागू नाहीत.