खांदेपालट ही सर्वच क्षेत्रात होते. प्रत्येक जण त्यांचा वारस नेमतो. त्याला रिलायन्स देखील अपवाद नाही. देशातील सर्वात मोठ्या रिलायन्स ग्रुपमध्ये खांदेपालट करण्यात आलंय. नवीन पिढीकडे आता व्यवसायाची सूत्रं देण्यात आली. रिलायन्स समुहाचा पसारा तेलापासून ते टेलिकॉम कंपन्यांपर्यंत पसरला असून रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी सोमवारी आपले वारसदार घोषित केले.
महत्वाच्या बाबी
१. मुकेश अंबानींच्या तीन मुलांमध्ये व्यवसायाची वाटणी
२. रिटेल व्यवसाय प्रमुखपदी ईशा अंबानीची नियुक्ती
३. अंबानींनी जिओची धुरा दिली आकाश अंबानीच्या हाती
४. हायड्रोजन ऊर्जा व्यवसायांच्या प्रमुखपदी अनंत अंबानी
देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फाइव्ह जीसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. या सभेमध्ये आपल्या भाषणात मुकेश अंबानी यांनी आपली मुलगी ईशा अंबानीची समूहाच्या रिटेल व्यवसाय प्रमुख म्हणून ओळख करुन दिली. आकाश, ईशा आणि अनंत या तिन्ही मुलांकडे स्वतंत्र जबाबदाऱ्या दिल्याचे अंबानी यांनी यावेळी सांगितले. वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.त्यामुळे रिलायन्स उद्योग एका विशाल कुटुंबाप्रमाणे एकत्र राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिलायन्सचे तेल शुद्धीकरण आणि पेट्रोरसायने, रिटेल आणि डिजिटल सेवा हे मुख्य व्यवसाय आहेत. डिजिटल सेवा व्यवसायातच दूरसंचार सेवेचाही समावेश आहे. यापैकी रिटेल व्यवसायासाठी रिलायन्स रिटेल व्हेन्चर लिमिटेड तसेच दूरसंचार व्यवसायासाठी जिओ प्लॅटफॉर्म्स अशा दोन उपकंपन्या कार्यरत आहेत. आकाश अंबानी यांच्याकडे जिओची जबाबदारी देण्यात आली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीचे ३० वर्षीय आकाश अंबानी हे अध्यक्ष आहेत. जिओ प्लॅटफॉर्म्सची ही उपकंपनी आहे. ईशा अंबानी यांच्याकडे रिलायन्स रिटेलची जबाबदारी आहे. त्या रिलायन्स रिटेल व्हेन्चरच्या ईशा प्रमुख आहेत. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थ, किराणा माल, फॅशन, ज्वेलरी, पादत्राणे, कपडे यांचे वितरण तसेच जिओमार्ट याची जबाबदारी त्या पेलत आहेत. तर अनंत अंबानी यांच्याकडे ऊर्जा व्यवसाय देण्यात आला. रिलायन्स समूहाच्या सौरऊर्जा, बॅटरी उत्पादन आणि हायड्रोजन ऊर्जा या व्यवसायांच्या प्रमुखपदी अनंत अंबानी यांची नियुक्ती केली. दरम्यान, या नियुक्तीनंतर मुकेश अंबानी यांनी आपण अद्याप निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले. ते पूर्वीप्रमाणेच ग्रुपमध्ये सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.