मुंबई : गेल्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला. सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊतांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जातोय. संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, आतापर्यंत पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नव्हता. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.
ईडीने पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ऑगस्ट महिन्यात संजय राऊत यांना अटक केली होती. तेव्हापासून संजय राऊत हे
ऑर्थर रोड तुरुंगात होते. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून गेल्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊत यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली होती. शिवसेनेचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम संजय राऊत हे चोखपणे पार पाडत होते. संजय राऊत भाजपविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची भूमिका लोकांना पटवून देण्याचे काम करत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत काही काळातच तुरुंगात गेल्याने ठाकरे गटाकडे प्रभावीपणे पक्षाची बाजू मांडणार प्रभावी वक्ता उरला नव्हता.
मात्र, आज न्यायालयाने २ लाखांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर केला.
दरम्यानच्या काळात अंधेरीची पोटनिवडणूक, सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, दसरा मेळावा अशा अनेक गोष्टी घडल्या. आता या सगळ्या नंतर संजय राऊत यांचं बाहेर येणं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळं संजय राऊत आता पहिल्यासारखेच धडाडणार की काही दिवस शांत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.